पाकिस्तान क्रिकेट बोर्डशी (पीसीबी) संबंधित सर्व समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. काहीच दिवसांपूर्वी रमीझ राजा यांना हटवून नजाम सेठी यांना पीसीबीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. नजाम यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी निवड समिती आणि पाकिस्तान क्रिकेटशी संबंधित इतर सर्व समित्या त्वरित बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीने २०१४ ची घटना बदलून त्याजागी २०१९ मध्ये एक नवीन घटना आणली होती. मात्र नजाम यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताच २०१९ ची घटना रद्दबादल ठरवली आहे. त्यामुळे २०१४ च्या घटनेने स्थापित केलेल्या सर्व समित्या नजाम यांनी त्वरित बरखास्त केल्या आहेत. मोहम्मद वसीम यांच्या अध्यक्षतेखालील मुख्य निवड समिती सुद्धा यामुळे बरखास्त करण्यात आली आहे.
याबाबत अधिक सांगताना नजाम सेठी म्हणाले, की ‘‘ २०१९ च्या घटनेनुसार निर्माण केलेल्या सर्व क्रिकेट समित्या आम्ही त्वरित निर्णयाने बरखास्त करणार आहोत. कायद्याला धरून नवीन आदेश काढण्यात येणार असून ; लवकरात लवकर आम्ही २०१४ क्रिकेट घटना आमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवीन आदेशानुसार देशांतर्गत क्रिकेटला सुद्धा प्राधान्य देण्यात येणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा भरविणाऱ्या राज्याच्या संघटनांमध्ये सुद्धा बदल करण्यात येणार आहेत ’’. ‘ रमीझ राजा जेव्हा पीसीबीचे अध्यक्ष झाले होते तेव्हा सर्व अधिकार त्यांनी स्वतःकडे एकवटवून घेतले होते. आता या अधिकारांचे सुद्धा विभाजन करणार असल्याचे नजाम म्हणाले आहेत ’.
निवड समितीचे माजी अध्यक्ष असणारे वसीम यांची २०२० च्या डिसेंबर महिन्यात नियुक्ती करण्यात आली होती.त्यांचा करार २०२३ च्या एकदिवसीय विश्वकरंडका पर्यंत होता.ते निवड समितीचे अध्यक्ष असताना पाकिस्तानने १६ कसोटी सामने खेळले असून ;त्यात आठ सामन्यांत विजय मिळवले आहेत. तर सहा लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्याच अध्यक्षपदाखाली संघाने ३४ ट्वेंटी-२० सामने जिंकले असून ; १८ लढतीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १० एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवला आहे.