जागतिक बॉक्सिंग स्पर्ध्येत निखतची घोडदौड सुरूच

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
भारताच्या अन्य तीन खेळाडूंनीही  केला उपांत्य फेरीत प्रवेश
भारताच्या अन्य तीन खेळाडूंनीही केला उपांत्य फेरीत प्रवेश

 

यजमान भारताच्या महिला खेळाडूंनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बुधवारी उल्लेखनीय कामगिरी केली. निखत झरीन, लवलिना बोर्गोहेन, नीतू घंघास व स्वीटी बूरा या चार खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे पदक पक्के केले. आता उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतरही या खेळाडूंना किमान ब्राँझपदक पटकावता येणार आहे.

 

निखतने ५० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत थायलंडच्या चुथमत रकसात हिला ५-२ असे हरवले. थायलंडची खेळाडू हिने दोन वेळा जागतिक स्पर्धेचे ब्राँझपदक पटकावले होते. निखत - चुथमत यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. निखत हिने तांत्रिक बाबीमध्ये सरस खेळ केला आणि विजय मिळवला हे विशेष.

 

नीतू हिच्यासमोर ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या मडोका वाडा हिचे आव्हान होते. जपानच्या मडोका हिने जागतिक स्पर्धेमध्ये दोन ब्राँझपदके जिंकली होती. नीतू - मडोकामधील लढत रेफ्रींकडून दुसऱ्या फेरीनंतर थांबवण्यात आली. नीतूच्या आक्रमक खेळापुढे मडोकाचा निभाव लागला नाही.

 

साक्षी, मनीषा, जास्मिन, नूपुरचा पराभव

भारताच्या चार खेळाडूंना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. साक्षी चौधरी हिला ५२ किलो वजनी गटात, मनीषा माऊन हिला ५७ किलो वजनी गटात आणि जास्मिन लाम्बोरियाला ६० किलो वजनी गटात निराशेचा सामना करावा लागला. नूपुरचीही हार झाली. यामुळे चौघांचे आव्हान तिथेच संपुष्टात आले.