कोणत्याही गोष्टीत शॉर्टकट ठेवू नका, मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवलात, तर प्रगती करताना कोणाचे पाय धरण्याची वेळ येणार नाही आणि खुशमस्करीही करण्याची गरज लागणार नाही, असे स्पष्ट मत पुणेरी पलटण संघाचा कर्णधार अस्लम इनामदार याने व्यक्त केले.
प्रो कबड्डी स्पर्धेचा यंदाचा मोसम २९ ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि महाराष्ट्र डर्बी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे-मुंबई संघाचे कर्णधार अनुक्रमे अस्लम इनामदार, सुनीलकुमार तसेच दोन्ही संघांचे प्रशिक्षक अजय ठाकूर आणि अनिल छापराना यांची आज पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत बोलताना अस्लमने संघाच्या आणि स्वतःच्या तयारीबाबतही भाष्य केले. यंदाची स्पर्धा चार शहरांत होणार आहे, परंतु त्यात पुणे-मुंबईचा समावेश नाही.
त्याबद्दल बोलाताना अस्लमने दुःख व्यक्त केले. पुणे-मुंबईत कबड्डीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांना प्रत्यक्ष सामने पाहता येणार नाहीत याचे वाईट वाटत आहे. पुण्यात सामने खेळत असताना आम्हाला उत्फूर्त पाठिंबा मिळत असतो.
कबड्डी हा शरीरवेधी खेळ आहे. येथे दुखापती होण्याच्या शक्यता अधिक असतात. दुर्दैवाने प्रमुख खेळाडूला दुखापत झाली, तर त्याचा मोठा परिणाम संघावर होतो. संघाचे मानसिक खच्चीकरण होते. संघाची घडी विस्कटते, असे अजय ठाकूर यांनी सांगितले.