यंदा भारत देश आपला ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर देशाची संस्कृती, इतिहास आणि भविष्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अभिमान निर्माण उद्देशाने २६ जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यात ध्वज वंदनानंतर प्रभात फेरी, भाषण स्पर्धा, नृत्य, खेळ असे उपक्रम राबवने अनिवार्य केले आहे. परंतु आगामी काही वर्षांमध्ये अधिकाधिक खेळाडू जगाच्या नकाशावर झळकावे या उद्देशाने पुण्यातील बोपोडी बज्मे-ए-नूर ही संस्था क्रीडा क्षेत्रात आपले योगदान देत आहे. ही संस्था गेल्या १३ वर्षांपासून प्रजासत्ताक दिनी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहे.
असे असणार स्पर्धेचे स्वरूप…
धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मुलामुलींना वयाची अट असणार आहे. तीन गटात याचे विभाजन केलेले आहे. पहिला गट हा वयवर्षे ६ ते १०, दुसरा गट १० ते १२ आणि तिसरा गट १२ ते १४ वय असणाऱ्या बालकांचा असणार आहे. धावण्यासोबतच लिंबूचमचा, स्लो सायकल या स्पर्धांचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे वयोवृद्धांसाठी सुद्धा वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ५० वर्षांपुढील नागरिकांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य असे की स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या प्रत्येकास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक देण्यात येणार आहेत. स्पर्धेनंतर या बालचमुंसाठी नाष्ट्याची सोय देखील करण्यात आली आहे.
बज्मे-ए-नूर संस्थेचे सदस्य आणि मिस फराह चॅरिटेबल फाउंडेशनचे को फाउंडर अन्वर शेख यांनी स्पर्धा आयोजित करण्याच्या उद्देशाविषयी सांगितले की, “दरवर्षी आम्ही राष्ट्रीय सणांना विविध उपक्रम राबवत असतो. विशेषतः क्रीडा क्षेत्राकडे आमचा कल जास्त आहे. यावर्षीही सालाबादप्रमाणे २६ जानेवारीला झेंडावंदननंतर आम्ही खेळांचे आयोजन केले आहे. क्रीडा क्षेत्राविषयी मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून आम्ही खेळांचे आयोजन करत असतो.”
ते पुढे म्हणतात, “प्रजासत्ताक दिनाला देशभरात उत्साहाचे वातावरण असते, त्यानिमित्ताने सर्वत्र विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रजासत्ताक दिन अशा पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशानेच आमची संस्था सुद्धा काही समाजोपयोगी उपक्रम घेत असते. समाजाचा एक भाग म्हणून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय सणांना आम्ही असे कार्यक्रम करत असतो.”
बज्मे-ए-नूर संस्थेविषयी…
पुण्यातील बोपोडी परिसरात बज्मे-ए-नूर ही संघटना स्थापन होऊन जवळपास ४५ वर्षे झाली. त्या काळात काही मुस्लीम लोक पुण्यात वास्तव्यास आले होते, त्यांनी मिळून ही संघटना स्थापन केल्याचा इतिहास सांगितला जातो. नजीर पीरजादे, कॅप्टन खुरेशी, उस्मान तांबोळी, रफिक तुर्क यांच्या नेतृत्वात या संघटनेची स्थापना झाली.
मुस्लीम समाजात एकजूट निर्माण करण्याचे उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मुस्लीम समाजाला येणाऱ्या अडीअडचणी यामाध्यमातून सोडवल्या जात असत. तसेच सामाजिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा या संस्थेचे योगदान राहिले आहे. काही काळानंतर ही संस्था सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करू लागली. शालेय विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध परीक्षा, मुलांचे धार्मिक ज्ञान वाढवण्यासाठी ‘तहरीर-तकरीर’ सारखे उपक्रम, धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम, रुग्णवाहिका, वैद्यकीय क्षेत्रात मदत अशा प्रकारचे आर्थिक सहाय्य ही संघटना करते आहे.
संस्थेचे क्रीडा क्षेत्रातील योगदान
आज आपण पाहतो पुणे शहराने क्रीडा क्षेत्रात गरूडझेप घेतली आहे. पुण्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू देशाला दिले आहेत. त्यावेळी शहरात बज्मे-ए-नूर संघटनेने क्रीडा क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. क्रिकेट लोकप्रिय असल्याने लोकांच्या मनात तेव्हापासून खेळाबद्दल रुची होती. त्याच काळात संघटनेमधील तरुण क्रिकेट प्रेमींनी एक संघ बनवला आणि त्याचे नाव ‘नूर स्पोर्ट्स’ असे ठेवले. नूर स्पोर्ट्स या उपसंघटनेत अनेक क्षेत्रातील क्रीडा प्रेमींनी सहभाग नोंदवला आणि आज मोठ्या प्रमाणात संस्थेचा विस्तार देखील झाला.
- भक्ती चाळक