टीम इंडियाची विजयी मिरवणूक पाहून 'असा' भारावून गेला शाहरुख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 16 d ago
टीम इंडिया आणि  शाहरुख खान
टीम इंडिया आणि शाहरुख खान

 

टीम इंडियाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल ११ वर्षांनंतर हा विश्वचषक भारताला मिळाला आहे. सध्या अवघ्या देशभरामध्ये टीम इंडियाचं कौतुक केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. अशातच बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान यानेही टीम इंडियाचे कौतुक केले आहे.

बार्बाडोस येथे आलेल्या वादळामुळे २ दिवस संपूर्ण संघ तिथेच अडकून पडला होता. अखेर ४ जुलै रोजी गुरूवारी (काल) सगळे खेळाडू भारतात परतले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकर फॅन्स वानखेडे स्टेडियम परिसरात मरीन ड्राईव्ह येथे जमले होते. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची ओपन डेक बसमधून विजयी परेड काढण्यात आली होती. ही परेड पाहून किंग खानने आपला आनंद पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

शाहरूख कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. नुकतंच अभिनेत्याने एक्सवर एक पोस्ट शेअर केली. त्याने एक्सवर टीम इंडियाचा मरीन ड्राईव्हवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. अभिनेत्याने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "टीम इंडियाला इतकं आनंदी आणि भावूक पाहून माझं मन गर्वाने भरून आलं. भारतीयांसाठी आजचा क्षण आश्चर्यकारक होता. आपल्या भारताच्या खेळाडूंनी आपल्याला इतक्या उंचीवर घेऊन जातात हे पाहणं खूप चांगलं वाटलं... टीम इंडियावर माझं प्रेम आहे. रात्रभर डान्स करा आणि धम्माल मस्ती करा. या निळ्या जर्सीतील मुलांनी कमाल केलीये.." अशी पोस्ट त्याने शेअर केलेली आहे. शाहरुखचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून ट्वीटवर भरभरून प्रतिक्रिया मिळत आहे..