नुकताच भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबो या ठिकाणी खेळवला गेला. या सामन्यात भारताने मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा दणदणीत पराभव केला. भारतीय संघाच्या या वेगवान गोलंदाजाने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करत ६ विकेट घेत सामनावीराचा किताब पटकावला.
सामना संपल्यावर जेव्हा हा पुरस्कार घेण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याने सामनावीर पुरस्काराचे मानधन श्रीलंकेच्या ग्राऊंड स्टाफला समर्पित केले. या सामन्यात २१ धावा देत ६ गड्यांना तंबूत पाठवणारा मोहम्मद सिराज एकदिवसीय प्रकारात सर्वात जलद ५० विकेट घेणारा चौथा भारतीय गोलंदाज बनला आहे.
आशिया चषकाच्या सुपर-४ फेरीपासूनच श्रीलंकेमध्ये पावसाचे सावट होते. या स्पर्धेतील अनेक सामने जोरदार पावसामुळे रद्द करण्यात आले. जे सामने खेळवले गेले, त्यातही पावसाने व्यत्यय आणला. मात्र, श्रीलंकन ग्राऊंड स्टाफच्या कार्यतत्परतेमुळे मैदान सुस्थितीत आणण्यात यश आलं आणि सामने खेळवले जाऊ शकले. त्यांच्या या कार्याने मोहम्मद सिराज प्रभावित झाला आणि आपल्या सामनावीर पुरस्काराची रक्कम ग्राऊंड स्टाफला समर्पित केली. त्याच्या या निर्णयामुळे सर्व स्तरातून प्रशंसा केली जात आहे.
हैदराबादच्या सिराजने प्रेमदासा स्टेडीअमच्या खेळपट्टीवर सात षटकांच्या आपल्या पहिल्या स्पेलमध्ये सहा गडी बाद करत श्रीलंकेच्या बॅटिंग ऑर्डरचं कंबरड मोडलं. त्याने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात श्रीलंकेच्या फलंदाजीला सुरुंग लावला आणि ४ फलंदाजांना तंबूत धाडत क्रिकेटच्या इतिहासात आपल्या नावाची नोदं केली. सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यावर मिळालेली रक्कम ग्राऊंड स्टाफला का दिली याचं उत्तर देखील सिराजने दिलं. तो म्हणाला की ग्राऊंड स्टाफमुळेचं या स्पर्धेचं आयोजन होऊ शकलं. त्यामुळे मी हे त्यांना समर्पित करतो.
मोहम्मद सिराजने आपल्या चौथ्या षटकात पथुम निसांका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजय डी सिल्वा यांना बाद करत श्रीलंकेचा धावफलक १२/५ असा करुन ठेवला. सहाव्या षटकात सिराजने कर्णधार दसून शनाकाचा अतिशय सुंदररित्या त्रिफळा उडवला. त्याचबरोबर त्याने कुसल मेंडिसलाही पायचित केले.