भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२३ च्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. सुपर ४ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
टीम इंडियाचा अजून एक सामना बाकी आहे, पण फायनलच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा सामना भारतासाठी चांगला असेल. अशा परिस्थितीत, पॉइंट टेबलमधील इतर संघांची काय स्थिती आहे ते जाणून घ्या...
सुपर ४ साठी पात्र ठरलेल्या चार संघांपैकी भारताने अंतिम फेरी गाठली आहे, तर बांगलादेश सलग दोन सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र अजूनही त्यांचा भारताविरुद्ध एक सामना बाकी आहे. जो १५ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
त्याचबरोबर श्रीलंका आणि पाकिस्तानला अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे आणि सुपर ४ मधील प्रत्येकी एक सामना गमावला आहे.
१४ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुपर ४ सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्याला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. हा सामना कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत श्रीलंकेला जिंकण्याची अधिक शक्यता आहे, कारण या संघाला आपल्या परिस्थितीची चांगलीच कल्पना आहे. याशिवाय पाकिस्तान दुखापतींनी त्रस्त आहे.