वाघ म्हातारा होत नाही! कैफचा 'तो' सुपरकॅच बघून अख्खी टीम झाली अवाक

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल
सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

 

 भारतीय संघातील बेस्ट फील्डर्सची यादी करायची झाल्यास मोहम्मद कैफचे नाव या यादीत बरेच वरच्या द्यावे लागेल. भारतीय संघात आजवर झालेल्या सर्वोत्तम फील्डर्सपैकी तो एक आहे. सध्या कैफचे वय 42 वर्ष आहे मात्र त्याची फील्डींग एखाद्या 18-19 वर्षीय तरुणाला लाजवेल अशीच आहे. कैफचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडीयात व्हायरल होत आहे.

कतारची राजधानी दोहामध्ये लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. या लीगमध्ये शनिवारी एलिमिनेटर 2 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आशिया लायन्स संघाने भारत महाराजांचा 85 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

मात्र, या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा भारत महाराजाचा स्टार फील्डर मोहम्मद कैफची जादू पाहायला मिळाली. या सामन्यात कैफने उपुल थरंगा आणि मोहम्मद हाफीजचे शानदार कॅच टिपले. कैफच्या या शानदार कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अनेकांना ते जुने दिवस आठवले…

आशिया लायन्सविरुद्धच्या शनिवारी झालेल्या सामन्यात भारत महाराजचा स्टार फील्डर मोहम्मद कैफने घेतलेली कॅच पाहून 'पब्लिक पागल' झाल्याचं पाहायला मिळालं. या सामन्यात त्याने घेतलेली कॅच आताच्या बऱ्याच खेळाडूंना देखील लाजवेल अशी आहे. मोहम्मद कैफने उपल थरंगा आणि मोहम्मद हाफिजला उत्कृष्ट डायव्हिंग कॅच घेत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कैफचे हे दोन्ही झेल इतके अप्रतिम होते की खुद्द फलंदाजांनाही यावर विश्वास बसला नाही. त्याचबरोबर कैफच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही कॅच पाहून क्रिकेट चाहत्यांना लोकांनी युवराज सिंह आणि कैफच्या जोडीचे ते गोल्डन दिवस आठवल्या शिवाय राहाणार नाहीत.

कैफने स्वतः देखील या कॅचचा व्हिडीओ ट्विट केला आहे. "तुमचे मैदानावरील सर्व 10 सहकारी तुम्हाला मिठी मारण्यासाठी धावत आहेत - हे केवळ तुमच्या क्षेत्ररक्षणामुळेच होऊ शकते. ही तुमच्या वचनबद्धतेची अंतिम पावती आहे, ज्या क्षणासाठी तुम्ही खेळ खेळता." असं भावनिक ट्वीट कैफने केलं आहे. त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील या व्हिडीओला दाद दिली आहे.