आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ येत्या ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होत आहे. वर्ल्डकप खेळण्यासाठी गुरूवारी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला. तब्बल ७ वर्षानंतर पाकिस्तानचा संघ भारतात दाखल होत आहे त्यामुळे त्यांचे भारतात जंगी स्वागत करण्यात आले. पाकिस्तान संघाला पाहण्यासाठी विमानतळापासून हॉटेलपर्यंत क्रिकेट चाहत्यांनी गर्दी दिसली.
पीसीबीने व्हिडिओ केला शेअर
पाकिस्तान संघाचे भारतात झालेले ग्रँड वेलकम पाहून पीसीबी देखील खूष झाली. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानी संघ विमानतळावरून बाहेर येते त्यावेळी अनेक लोक पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या स्वागताला उभे असतात. कडक सुरक्षा व्यवस्थेत पाकिस्तानचे क्रिकेटपटू विमानतळावरून बाहेर पडतात. त्यानंतर संघ हॉटेलकडे जाण्यासाठी रवाना झाला. त्यावेळी रस्त्यावर देखील क्रिकेट चाहते उभे असलेले दिसले. यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपूट आश्चर्यचकित आणि काहीसे भावूक देखील झाले.
हॉटेलमध्येही जंगी स्वागत
पाकिस्तानी संघाचे विमानतळ, रस्त्यावर जंगी स्वागत झाल्यानंतर खेळाडू हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आळे. हॉटेल स्टाफने प्रत्येक खेळाडूच्या गळ्यात भगवी शाल घालून स्वागत केले. हॉटेलमधील स्टाफने देखील पाकिस्तानी क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पाकिस्तानी संघ ७ वर्षांनी भारतात दाखल झाला आहे. यापूर्वी २०१६ चा टी २० वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तान भारतात आला होता. मात्र यानंतर ना कधी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये गेला ना कधी पाकिस्तानी संघ भारतात आला.
पाकिस्तान नेदरलँडविरूद्ध खेळून करणार मोहीम सुरू
पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये आपला पहिला सामना हा ६ ऑक्टोबरला नेदरलँडविरूद्ध खेळणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरूद्ध २९ सप्टेंबरला तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ ऑक्टोबरला सराव सामना खेळणार आहे.