भारताचा पदकांचा चौकार ; निखत, लवलिनाचाही सुवर्ण पंच

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
निखत, लवलिना यांना सुवर्ण पद
निखत, लवलिना यांना सुवर्ण पद

 

निखत झरीन व लवलिना बोर्गोहेन या भारताच्या महिला बॉक्सर्सनी रविवारी जगज्जेतेपदावर मोहोर उमटवली. निखतने ५० किलो वजनी गटात, तर लवलिना हिने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

 

निखतचे हे दुसर जगज्जेतेपद ठरले, तर लवलिना हिने पहिल्यांदाच विश्‍वविजेती होण्याचा मान संपादन केला. या आधी शनिवारी नीतू घंघास व स्विटी बुरा या दोन महिला खेळाडूंनी भारताला सुवर्णपदके जिंकून दिली होती. यजमान भारताने या स्पर्धेमध्ये चार सुवर्णपदक पटकावत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

 

निखत हिने व्हिएतनामच्या नगुएन थी थाम ताम हिला ५-० असे पराभूत केले. निखत हिने या लढतीत अचूक पंचेस मारले. तसेच या लढतीत तिच्या पायाच्या हालचालीही वेगवान होत्या. तिच्या जबरदस्त कामगिरीपुढे व्हिएतनामची खेळाडू तग धरू शकली नाही.

 

निखत हिचे पहिल्या फेरीत वर्चस्व दिसून आले. तिला या फेरीत ५-० असे यश मिळाले; पण नगुएन हिने दुसऱ्या फेरीत पुनरागमन केले. ३-२ अशा फरकाने तिने बाजी मारली. अखेरच्या फेरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या; पण या फेरीत निखतने सर्वस्व पणाला लावून आक्रमक खेळ केला. निखतने जोरदार आक्रमण करीत ही लढत आपल्या नावावर केली.

 

लवलिना हिला २०१८ व २०१९ मधील जागतिक स्पर्धेमध्ये ब्राँझपदक पटकावता आले होते. यंदा मात्र तिने पदकाचा रंग बदलला. पहिल्या फेरीपासून तिने छान कामगिरी केली होती. अंतिम फेरीतही तिच्याकडून तशीच कामगिरी झाली. लवलिना हिने सुवर्णपदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या केटलीन पारकर हिच्यावर ५-२ असा विजय साकारला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

 

 

 

या वेळेस सुवर्णपदक विजेती निखत झरीन ने मत व्यक्त केल की, अंतिम सामना हा या स्पर्धेतील सर्वात आव्हानात्मक होता. अखेरच्या फेरीत आक्रमक खेळ करायचे आधीच ठरवले होते. लढतीनंतर रेफ्रींकडून माझा हात उंचावण्यात आला तेव्हा आनंद गगनात मावेनासा झाला. हे पदक मी ५० किलो वजनी गटात मिळवले आहे. त्यामुळे या पदकाचे महत्त्व अधिक आहे.

 

तसेच लवलिना बोर्गोहेन ही दुसरी सुवर्णपदक विजेती ठरली आहे. त्यावेळेस तिने तिच्या आयुष्यात या पदकाच महत्व सांगताना सांगितले की, अंतिम फेरीच्या लढतीत प्रतिस्पर्धी बलाढ्य होती. त्यामुळे सुरुवातीला आक्रमक खेळ केल्यानंतर अखेरच्या फेरीत दूर राहून खेळण्याचे प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले. आखलेल्या योजना ९० टक्के अमलात आणण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी हे पदक खूप महत्त्वाचे होते. पदकाचा रंग बदलता आल्याचाही आनंद आहे. आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.