यहा के हम 'सिकंदर'!

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 8 Months ago
पैलवान सिकंदर शेख
पैलवान सिकंदर शेख

 

कुस्ती हा प्रचंड अंगमेहनतीचा खेळ. चांगला मल्ल व्हायचं असेल तर खुराकासाठी पैसा गरजेचाच असतो. परंतु कुस्ती ही गरिबाघरीच नांदते असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात शेतकरी, कामगार वर्ग समूहातून आलेल्या अनेक मल्लांनी कुस्तीमध्ये नाव कमवलं.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव, हिंदकेसरी गणपत आंधळकर ते कुस्ती सम्राट अस्लम काझीपर्यंत अनेक उदाहरणे घेता येतील. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात अशाच एका मल्लांची चर्चा सुरू आहे,

तो म्हणजे एका हमालाचा पोरगा म्हणून ओळखला जाणारा पैलवान सिकंदर शेख. पुण्याजवळील फुलगाव येथे झालेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखनं गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवर अवघ्या तेवीस सेकंदांत झोळी डावावर चीतपटीने विजय मिळवत ''महाराष्ट्र केसरी'' हा मानाचा किताब जिंकून विक्रम नोंदवला. सिकंदरच्या या विजयाचा जल्लोष संबंध महाराष्ट्रात झाला.

संपूर्ण सोशल मीडिया देखील सिकंदरमय झाला होता. या चर्चेला पार्श्वभूमी देखील तशीच होती. गत वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीच्या निकालावरून वाद रंगला आणि आख्ख्या महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींनी या वादात उडी घेतली.

सिकंदरच्या लढतीत मागील वेळी गुणदानात पंचाकडून चूक झाल्याने त्याला पराभवाचा फटका बसल्याची प्रकट भावना राज्यभर उमटली होती. या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी यंदा मात्र सिकंदर मोठ्या आत्मविश्वासाने व ईर्षेने मैदानात उतरला होता.

''महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्याशिवाय राहणार नाही,'' असे आश्वासनच त्याने गतवर्षापासून कुस्तीशौकिनांना दिले होते. हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी सिकंदर मोठ्या हिमतीने संपूर्ण स्पर्धेत लढला व मानाची गदा जिंकून आपल्या चाहत्यांना दिलेला शब्द पूर्ण केला. सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा.

घरात आजोबांपासूनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्र्याची गडद छाया कायमची. घरात वडील रशीद शेख पैलवानकी करायचे. रशीद पैलवानकी करत असताना तालमीची स्वच्छता करायचे आणि त्या बदल्यात तालमीतील मल्ल जो खुराक देतील, तो खायचा आणि सराव करायचा.

असं सुरू असतानाच वडिलांची प्रकृती खालावली म्हणून रशीद घरी परतले आणि लग्नगाठ बांधली गेली. संसाराचा गाडा हाकत असतानाच दोन वेळच्या खाण्याचीही भ्रांत कायमचीच झाली. मात्र तेव्हाही कुस्ती सोबतीला होती.

पुन्हा कुस्ती लढायला त्यांनी सुरवात केली. कुस्तीत जिंकलेल्या इनामावर जगणं सुरू होते. त्यात संसारवेलीवर हुसेन आणि सिकंदर ही दोन फुले उमलली आणि मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भरेनासे झाले.

त्यात त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा पर्याय निवडला. दिवसभर हमाली करायचे, घाम गाळायचा पण कुस्तीची नशा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले.

हमालीनं थकलेलं शरीर सावरत आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचं मार्गदर्शनही मिळत होते. सिकंदर अलिकडं चांगल्या कुस्त्या करू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. त्यातच सिकंदरच्या वडिलांना आजारानं गाठलं आणि त्यांची हमाली थांबली.

खुराकाला लागणाऱ्या पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेननं आपली कुस्ती थांबवत वडिलाच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिकंदर वडिलांचं स्वप्न उराशी बाळगून कोल्हापूरच्या गंगावेस तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारुगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकू लागला.

गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिकंदरनं राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या २४ व्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चीतपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिकंदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्तीपटावर चमकला.

महाराष्ट्र, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, जम्मू, उत्तर प्रदेशसह भारतातील प्रसिद्ध कुस्ती मैदानं सिकंदरने जिंकली आहेत. परंतु गेल्या तीनचार वर्षांपासून महाराष्ट्र केसरीची गदा त्याला हुलकावणी देत होती.

आपल्या मुलानं महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकावा, ही त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. आपल्या वडिलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र्य हटावं यासाठी प्रचंड मेहनत करून सिकंदरनं आज ही इच्छा पूर्ण केली आहे.

वडिलांनी ज्या खांद्यावरून पोती वाहिली, त्या खांद्यावर सिकंदरनं मानाची गदा ठेवत वडिलांच्या कष्टाचे पांग फेडले. आतापर्यंत देशभरात कुस्ती लढून सिकंदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये दोन महिन्द्रा थार कार, दोन जॉन डिअर ट्रॅक्टर, पाच अल्टो कार, पंचवीस बुलेट, सात टीव्हीएस, सात स्प्लेंडर दुचाकी तर तब्बल पन्नास चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.

३९ वर्षांनंतर गंगावेस तालमीला मान...
सिकंदर सध्या कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेस तालमीत सराव करतो. वस्ताद विश्वास हारुगले हे या ठिकाणी मुख्य प्रशिक्षक आहेत. या तालमीला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर, हिंद केसरी दीनानाथ सिंह,

रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार, कुस्तीसम्राट अस्लम काझी यांसारख्या दिग्गज मल्लांनी या तालमीचं नाव केलं. १९८४ मध्ये या तालमीचे मल्ल नामदेव मोळे यांनी महाराष्ट्र केसरीचा मान या तालमीला मिळवून दिला होता.

त्यानंतर मानाची गदा तालमीपासून दूर राहिली. सिकंदरच्या रूपानं हा दुष्काळ मिटला आणि तब्बल ३९ वर्षांनी त्यानं गंगावेस तालमीला किताब मिळवून दिला. सिकंदरच्या या कामगिरीबद्दल कोल्हापुरात त्याची जंगी विजयी मिरवणूकही निघाली. पैलवान सिकंदर सध्या सोशल मीडियाट्रेंड मध्ये आहे. अनोखी लोकप्रियता, कुस्तीशौकिनांचे प्रेम त्याला मिळत आहे.

सिकंदरला कुस्तीचं जग जिंकायचंय...
कमी वयात अधिक क्षमता असलेला मल्ल म्हणून सिकंदरची ओळख आहे. सकाळी सहा तास व संध्याकाळी सहा तास तो कसून सराव करतो. मातीतल्या कुस्तीसह मॅट वरील कुस्तीचं तंत्र त्यानं लवकर आत्मसात केलंय.

पुरेपूर उंची, बलदंड शरीर, लवचीकता, डावबाजी व आक्रमकता ही सर्व गुणवैशिष्ट्ये सिकंदरच्या अंगी दिसून येतात. प्रतिस्पर्धी मल्लाने हल्ला चढवण्याआधीच आक्रमण करत त्या मल्लास चीतपट करण्याचे तंत्र सिकंदरच्या अंगी आहे.

कुस्ती लढताना झोळी, घिस्सा, भारंदाज, घुटना यांसारख्या डावांचे बाण त्याच्या भात्यात असतात. महाराष्ट्र केसरी किताब जिंकून कुस्तीतून निवृत्ती घेणाऱ्या मल्लांचं प्रमाण जास्त आहे. हा मान मिळाला की प्रतिष्ठा मिळते, तो मल्ल नावारूपाला येतो आणि इथेच तो आपल्या कुस्तीची समाप्ती करतो.

या मूळ कारणामुळं आपले मल्ल ऑलिम्पिकपासून दूर आहेत, असा एक निष्कर्ष काढला जातो. परंतु या किताबावरच समाधान न मानता सिकंदरला भारताचं प्रतिनिधित्व जगभर करायचं असल्याचं तो सांगतो. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊन भारतासाठी पदक जिंकण्याचं त्याचं स्वप्न आहे. यानिमित्तानं सिकंदर कुस्तीचं जग जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे.

महाराष्ट्र केसरीचा असाही वाद...
महाराष्ट्राच्या कुस्ती संघटनेत गेल्या वर्षी दोन गट पडले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ अशा दोन्ही संघटनांनी यंदा आठवडाभराच्या फरकाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली.

पुण्यात कुस्तीगीर संघानं भरवलेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेखनं बाजी मारली तर धाराशिव येथे कुस्तीगीर परिषदेनं भरवलेल्या ६५ व्या स्पर्धेत गतवर्षीचाच महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला पराभूत करत दुसऱ्यांदा मान मिळवला.

या दोन्ही स्पर्धांमुळं कुस्तीशौकिनांमध्ये संभ्रम निर्माण झाला. दोन्ही संघटना आपली स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा सध्या करत आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानं लवकरच यात स्पष्टता येईल.

शिवराज राक्षे महाराष्ट्रातील तगडा, बलदंड पैलवान, धिप्पाड, आखीव रेखीव शरीरयष्टीचा मल्ल म्हणून शिवराजची ओळख आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावातील गरीब शेतकरी कुटुंबातला हा शिवराज.

प्रचंड मेहनत करून शिवराजनं शरीर कमवलं आहे. त्याचे दंड, मांड्या, शरीराचा प्रत्येक स्नायू तोलून मापून घ्यावेत असे. धाराशिव येथे कुस्तीगीर परिषदेकडून आयोजन केलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत त्याने सदगीरवर गुणाधिक्याने मात करत महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकलाय.

शिवराज ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्धी मल्लाला वरचढ ठरतो. समोरच्या मल्लावर आक्रमण करत त्याला आखाड्याबाहेर ढकलून गुण घेण्यात शिवराज तरबेज आहे. आपल्या विरोधी मल्लाचा कब्जा मजबूत करून भारंदाज डाव मारत कुस्ती जिंकण्याचा तो प्रयत्न करतो. दहा महिन्यांपूर्वी कोथरूड येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा मान त्याने मिळवला होता.

तसेच तो वरिष्ठ राष्ट्रीय विजेता देखील आहे. सिकंदर शेख, शिवराज राक्षेसह, पृथ्वीराज मोहोळ, माउली कोकाटे या खुल्या गटातील मल्लांकडून देखील महाराष्ट्राच्या कुस्तीशौकिनांच्या पुढे देखील चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहेत.
 
लेखक- मतीन शेख
(लेखक कुस्तीगीर आहेत. तसेच पत्रकारिता क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत.)