काश्मीरमधील सकरात्मक बदल टिपणारे दोन युवा रॅपर्स

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 4 Months ago
काश्मीरी रॅपर एमसी रा आणि हुमैरा
काश्मीरी रॅपर एमसी रा आणि हुमैरा

 

मेहक बंदे 


काश्मीरी रॅपर हुमैरा आणि एमसी रा यांच्या 'बदलता कश्मीर' या रॅप गाण्याने दहा लाख व्ह्यूज मिळवून इंटरनेटवर धुमाकळ घातला आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर कश्मीर खोऱ्यात झालेल्या सकारात्मक बदलांवर हे गाणे आधारित आहे.


'बदलता काश्मीर' हे गाणे काश्मिरी रॅपर्सनी त्यांच्या भोवताली अनुभवलेल्या त्यांच्या आजूबाजूला सकारात्मक बदलांविषयी आणि काश्मीरच्या तरुणांच्या आकांक्षांबद्दल आहे. या गाण्यामध्ये जी२० ची अध्यक्षता, काश्मीरी पंडित आणि काश्मीरी मुस्लिम यांच्यातील सौहार्द यांविषयीचे वर्णन केले.


देशभरातील महत्त्वाच्या व्यक्ती, राजकीय नेते, सेलेब्रेटी या गाण्यावर चर्चा करताना दिसत आहेत. अनेकांनी सोशल मिडियावरही याविषयी लिहिले आहे. "काश्मिरी तरुणाई व्यक्त होत आहे, ते ही एका एनर्जेटिक रॅप साँगमधून..."  नव्या काश्मीरच्या उदयाची साक्ष देणारे हे गाणे जरूर ऐका." हे कॅप्शन देऊन भारत सरकारने देखील आपल्या my gov या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हे गाणे शेअर केले.


रॅपर एमसी रा चे खरे नाव मोहम्मद रसिक अहमद शेख आहे. तो दक्षिण कश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील पीरपोरा गावचा रहिवासी आहे. तो म्हणतो, "काश्मीरमध्ये होणारे आश्वासक बदल, येथील विकासकामे या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प, जी-२० ची यशस्वी अध्यक्षता यांसारख्या उपक्रमांमुळे मला या गाण्याची प्रेरणा मिळाली. श्रीनगरहून शोपियांला जाताना वाटेत जी काही विकासकामे दिसली, त्यावर मी रॅप बनवण्याचा प्रयत्न केला."


एमसी रा

 

'आवाज-द व्हॉईस'शी बोलताना, एमसी रा म्हणतो, " हे गाणे लिहित असताना मला वाटलं या गाण्यात एक महिला कलाकारही असावी. मुलींना त्यांच्या कपड्यांवरून किंवा त्या कशा प्रकारे वागतात यावरून जज केले जायचे, पण आता पूर्वीसारख्या गोष्टी राहिल्या नाहीत.”


भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानेही या गाण्याची प्रशंसा केली. ट्विटरवर तो लिहितो, "या काश्मीरी कलाकाराने प्रो-लेव्हल रॅपिंग दाखवले – वेल डन#जम्मू आणि काश्मीर."


इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही हे गाणे शेअर केले आणि लिहिले, "नव्या भारताचा नवा काश्मीर. तरुण भारतीय #काश्मीरचे चित्र बदलत आहेत!."


एमसी राच्या अनेक रॅप्स सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. आपल्या गाण्यांमधून तो भवतालच्या घटना, काश्मिरी तरुणांची स्थिती, ड्रग्स व व्यसनाधीनता यावर गाणी करताना दिसतो. 


“२०१४ मध्ये रफ्तारचा ‘मेरा देसी कलाकार’ हा अल्बम रिलीज झाल्यानंतर मला रॅप करायची आवड लागली त्यानंतर २०१९ मध्ये मी माझे पहिले रॅप लिहिले. साध्या कुटुंबातून येणारा एम सी रा सांगतो की त्याने त्याचे पहिले गाणे १०० रुपयांवाल्या इयरफोनवर रेकॉर्ड केले.” असेही रा याने सांगीतले.


‘सेव्ह युथ सेव्ह फ्यूचर’ या संस्थेचे प्रमुख वजाहत फारूक भट यांनी एमसी रामध्ये लपलेल्या कलाकाराला ओळखले आणि त्याला प्रोत्साहन दिले. त्याने यंग अचिव्हर्स अवॉर्ड २०२१ सारखे अनेक पुरस्कार जिंकले आहेत. शिवाय २०२१ मध्ये भारतीय सेनेवरील ‘देश का सिपाही’ हे गाणेही बनवले.


'जोश टॉक्स' या प्रेरणादायी टॉक्स शो मध्ये जम्मू-काश्मीरमधून बोलणाऱ्या काही निवडक व्यक्त्यांपैकी एम सी रा एक आहे. एमिवे बनताई नंतर या शो मध्ये बोलण्याचा मान मिळवणारा तो दुसरा रॅपर ठरला आहे. 


एम सी रा बरोबर गाताना दिसणारी मुलगी म्हणजे १४ वर्षीय हुमैरा जान. ती मध्य  काश्मीरच्या मार्गुंड, कांगण भागातील असून ती ‘आर्मी गुडविल स्कूल’ची माजी विद्यार्थिनी आहे. 


हुमैरा जान

 

आपल्या संगीत प्रवासाबद्दल हुमैरा म्हणते, “मी दुसरीच्या वर्गात असताना मला यो यो हनी सिंहचा रॅप अल्बम देसी कलाकार ऐकायला मिळाला. त्यानंतर मला ते आवडत गेले आणि मी हिप हॉप कलाकारांना फॉलो करायला सुरुवात करून त्यांची गाणी गायला लागले.”


हिप-हॉप या संगीत प्रकाराला तिने इतके गांभीर्याने घेतले नव्हते, ती केवळ मनोरंजनासाठी गाणे गायची. मात्र ऑगस्ट २०२१ मध्ये गंदरबल जिल्ह्यात झालेल्या रॅप स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिच्या पालकांनीही तिला ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले.


रॅप गाण्याच्या थीमबद्दल हुमैरा म्हणते, "मी माझ्या आजोबांकडून ऐकले आहे की पूर्वी काश्मीर इतका विकसित नव्हता आणि आमच्या घरापासून श्रीनगरला जायला खूप वेळ लागायचा. रस्ते-पूल चांगल्या स्थितीत नव्हते मात्र आज श्रीनगरला पोहोचण्यासाठी फक्त ३० ते ४० मिनिटे लागतात. गंदरबल जिल्ह्यात सुरू असलेला झोजिला बोगदा प्रकल्प आणि कार्यरत असलेला वेल ब्रिज यामुळे माझ रोजच आयुष्य अधिक सुखकर झाले आहे.”

 

हुमैराला सिनेमाची आवड आहे. तिने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ मध्ये शाहिदा या पात्रासाठी साठी बॉडी-डबल म्हणून कामही केले आहे. खरे तर तिचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न आहे. मात्र इथे तशी संधी नव्हती, अशी खंतही तिने व्यक्त केली. 


सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर हुमैराने इतर कलाकारांसमवेत काम करायला सुरुवात केली. रॅपर रफ्तार तिचा आदर्श आहे. त्याला भेटण्याची हुमेराची इच्छा आहे. या भेटीसाठी ती प्रचंड उत्सुक आहे.


हुमेरा आयुष्याकडे सकारात्मकपणे बघते. ती म्हणते, "मी इतरांच्या मतांनी आणि टीकांनी खचून जात नाही.  मी मनापासून भारतावर प्रेम करते आणि ते मी या गाण्यातून व्यक्त केले आहेत. आयुष्य हे एकदाच मिळते. त्यात नकारात्मकतेला जागा असू नये.”


(अनुवाद-पूजा नायक)


- मेहक बंदे