बोहरा हे इस्माइली पंथाच्या एका उपपंथाचे अनुयायी आहेत. पहिल्यांदा धर्मांतरित झालेले बहुसंख्य लोक ब्राह्मण व्यापारी होते, म्हणून या पंथाला ‘बोहरा’ असे नाव देण्यात आले आहे. व्यापार या अर्थाच्या ‘वेह्वार’ या गुजराती शब्दापासून (संस्कृत-व्यवहार) बोहरा हा शब्द बनला आहे. बोहरा समाज हा अजूनही मोठ्या प्रमाणात व्यापारीच आहे आणि त्याने आपले जीवन शांततामय व्यवसायांना वाहिलेले आहे. हा अल्पसंख्य समाज राजकारणापासून अलिप्त असून पोलिसांच्या नोंदींमध्ये तो राजकीय महत्त्वाकांक्षांपासून मुक्त आहे. बहुसंख्य बोहरा हे शियापंथी व व्यापारी असले, तरी काही बोहरा हे सुन्नी असून ते प्रामुख्याने शेती करतात. १५३९ पर्यंत बोहरांचे पंथप्रमुख येमेनमध्येच राहत असत. भारतातील बोहरा त्यांच्याकडे जाऊन आपल्या समस्या त्यांच्याकडून सोडवून घेत. परंतु येमेनपेक्षा भारतातील अनुयायांची संख्या खूपच वाढल्यामुळे १५३९ साली पंथप्रमुख येमेनहून द. गुजरातमधील सिद्धपूर येथे आले.