जगातील एकूण ऊर्जेपैकी निम्मी ऊर्जा एकट्या आशिया खंडात वापरली जाईल

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
IEA
IEA

 

बर्लिन: आशिया खंडातील देशांमध्ये ऊर्जेचा वापर वाढला असून, २०२५ पासून जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी निम्मी ऊर्जा एकट्या आशिया खंडात वापरली जाईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) वर्तविला आहे. आफ्रिका खंडाची लोकसंख्या अधिक असली तरी त्या तुलनेत त्यांच्याकडून ऊर्जेचा होणारा वापर कमीच आहे, असे या संस्थेने म्हटले आहे.
 
आशियामध्ये चीनकडून ऊर्जेचा सर्वाधिक वापर होतो. २०१५ मध्ये जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी एक चतुर्थांश ऊर्जा एकट्या चीनमध्ये वापरली जात होती. हे प्रमाण २०२५ पर्यंत एक तृतियांशपर्यंत वाढेल, असा अंदाज ‘आयईए’ने वर्तविला आहे. युरोप, अमेरिका आणि भारताकडून वापरल्या जाणाऱ्या एकत्रित ऊर्जेपेक्षाही चीनचा वापर अधिक असेल, असे ‘आयईए’ने म्हटले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वीजेचा वापर पाहता आफ्रिका खंडात फारच कमी ऊर्जा वापरली जाते. जगाच्या एक पंचमांश लोकसंख्या असलेल्या या खंडात २०२५ मध्ये वीजेचा वापर तुलनेने केवळ तीन टक्के असेल. याचाच अर्थ, आफ्रिकेमध्ये अजूनही बऱ्याच मोठ्या भागाचे विद्युतीकरण झालेले नाही.
 
अणुऊर्जेचा वापर वाढणार
आगामी तीन वर्षांत ऊर्जेचा वापर वाढणार असून या वाढलेल्या ऊर्जेत अणु ऊर्जा आणि पवन, सौर अशा अपारंपरिक ऊर्जेचे प्रमाण अधिक असेल, असा अंदाज ‘आयईए’ने व्यक्त केला आहे. यामुळे वीज क्षेत्राकडून होणाऱ्या हरित वायू उत्सर्जनात घट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. ऊर्जेचा वापर आणि मागणी ही आता वातावरणातील बदलावरही अवलंबून राहत असल्याबाबतची चिंताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.