धर्मापलीकडची 'डोळस' प्रेमकहाणी

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
 वृषाली आणि रज्जाक
वृषाली आणि रज्जाक

 

नाशिकमध्ये असे एक जोडपे आहे, ज्याने धर्माच्या  भिंती तर ओलांडल्याच शिवाय शारीरिक व्यंगावर मात करून आपले नवे व्यासपीठ तयार केले आहे. दृष्टिहीन असलेली, काव्यातून आणि निवेदनातून आपले दुःख विसरणारी वृषाली गुजराथी आणि निवेदनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करत भ्रमंती करणारे रज्जाक शेख... या दोघांच्या प्रेमाची गुंफण घालणारी हि संघर्षमय कथा...

 

- छाया काविरे


वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत सर्वसामान्य मुलींप्रमाणे हुंदडणारी-बागडणारी वृषाली अचानक एके दिवशी दृष्टिहीन झाली आणि तिच्या जीवनात काळोख पसरला... रेटिनल पिग्मेंटोसा या आजाराने तिला अंधत्व आले. मात्र, पुढे आपले काय होणार, याची चिंता करत न बसता समोर आलेल्या संकटांना तोंड द्यायचे आणि लढत राहायचे, असा निर्धार त्या कुमारवयीन मुलीने केला. नाशिकमधील 'केटीएचएम महाविद्यालया'तून बीए-हिंदीचे शिक्षण घेत असताना परीक्षेसाठी तिला 'रायटर'ची आवश्यकता होती. त्या वेळी रज्जाक शेख या तरुणाने तिला मदत केली.


रज्जाकचे अक्षर सुंदर होते, लिहिण्याचा वेग चांगला होता, त्यामुळे वृषालीही आत्मविश्वासाने त्याला उत्तरे डिक्टेट करू शकली. पुढे ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर त्या दोघांचा खूप दिवस संपर्क आला नाही... पण ज्योती गजभिये यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या ‘हिंदी साहित्य मंच’मुळे ते पुन्हा संपर्कात येऊ लागला. हिंदी साहित्य, कविता यांची वृषाली आणि रज्जाक दोघांनाही आवड असल्याने ते 'हिंदी मंच'च्या निमित्ताने भेटू लागले, बोलू लागले, अनेक विषयांवर त्यांच्यात चर्चा रंगू लागल्या. परीक्षेच्या निमित्ताने आधी ओळख झालेलीच होती. 'हिंदी मंच'च्या निमित्ताने ती ओळख दृढ होत गेली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. अनेक गोष्टींमध्ये दोघांचे एकमत असायचे. दोघांची मते जुळायची. मग विचारही जुळू लागले आणि मनेही. दोघांचीही मते, विचार जुळतात हे त्या दोघांपेक्षा त्यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांना अधिक जाणवायचे. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात झाली एका नव्या प्रवासाला.


वृषालीने आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगितले. दोघांच्याही घरी वादळाला उधाण आले. सुरुवातीला तिच्या घरी हे मान्य झाले नाही. तिच्या वडिलांना तिची काळजी वाटत होती. तिच्या अंधत्वाविषयी सुरुवातीला दया आणि नंतर तिटकारा असे तर होणार नाही ना, ही चिंता त्यांना एक वडील म्हणून साहजिकच सतावत होती. त्यातच रज्जाक मुस्लिम, तर वृषाली ही हिंदू-गुजराथी. त्यामुळे धर्माचाही प्रश्न होताच...


एकदा वृषाली रज्जाकला तिच्या अंधत्वाविषयी शंकित मनाने बोलली, तेव्हा रज्जाकने दिलेले उत्तर अंतर्मुख करून जाणारे होते. तो तिला म्हणाला, "मला दोन डोळे आहेत, ते आपल्या दोघांसाठी पुरेसे आहेत. इथून पुढे तू माझ्या डोळ्यांनी जग बघशील.”


घरच्यांच्या विरोधाला न जुमानता दोघांनीही 'हिंदू- मुस्लिम' हे समीकरण जुळवून आणले. ते दोघे २७ जुलै २००७ रोजी विवाहबद्ध झाले. आयुष्यातल्या एका नव्या इनिंगला सुरुवात झाली. घरच्यांचा किंवा नातेवाइकांचा कुठलाच आधार नसताना त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू राहिली.


वृषालीचा दृष्टिदोष, रज्जाकची बेरोजगारी आणि समाजाची उपेक्षा अशा अडचणींचा सामना करून या जोडीने हसतमुखाने परिस्थितीशी दोन हात करत तिच्यावर मात केली आहे. एकमेकांना वाटणाऱ्या आंतरिक जिव्हाळ्याने या दोन जिवांना जाती-धर्माच्या, विरोधाच्या व उपेक्षेच्या भिंती पाडून एकत्र आणले.  घरच्यांचा सुरुवातीला असलेला विरोधही आता मावळला आहे. दोघांची भरारी पाहून त्यांचे पालकसुद्धा आता खूश आहेत.


पुढे दोघांनी एकमेकांच्या सोबतीने आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी 'मिरॅकल' नावाची कंपनी स्थापन केली. आकाशवाणीचे आणि सरकारी योजनांचे माहितीपट, जाहिराती करण्यास सुरुवात केली. बेरोजगार असलेल्या रज्जाकला वृषालीच्या रूपाने मोठा आधार मिळाला. दरम्यान, अनेक चढ-उतार, अडचणी त्या दोघांना विळख्यात घेण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, दृष्टिहीन वृषाली रज्जाकला मानसिक आधार देत राहिली.


कविवर्य कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे : 'अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा

                                                          किनारा तुला पामराला!


अशी अनंत ध्येयासक्ती बाळगणाऱ्या वृषालीचे नाव 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदवले गेले आहे. आणि, ती भारताची पहिली अंध महिला रेडिओ स्टार झाली आहे. अंध असूनही कोणत्या जाहिरातीला कसा आवाज सूट होईल याचा अंदाज घेऊन वृषाली आपला आवाज वापरत असते. ती कविता तर करतेच; शिवाय, चांगले गायनही करते. बाहेरचा इतका व्याप असूनही वृषाली घरात सर्वसामान्य गृहिणीसारखीच वावरते. घरात वयोवृद्ध सासूबाईंची सेवा असो, घरातली साफसफाई असो, ही सगळी कामे ती कुशलतेने करते.


मुख्य म्हणजे, अंध असूनही गॅसवर सराईतपणे स्वयंपाक करण्यात तिचा हातखंडा आहे. रज्जाकही सामाजिक संस्थांसाठी डॉक्युमेंट्रीज् करण्यात व्यग्र असतो. या कामाबरोबरच सामाजिक कामातही तो अग्रेसर असतो. मेधा पाटकर यांच्यासमवेत 'नर्मदा बचाव आंदोलना'तही तो सक्रिय होता. आलेल्या संकटांना परिस्थितीला न डगमगता, हसत हसत तोंड देत खरोखरच त्यांच्याकडून एखाद्याने सुखाचा मंत्र घ्यावा, असे हे जोडपे आहे. वृषाली-रज्जाक ह्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. रायमा तिचं नाव.


वृषाली आणि रज्जाक आज ज्या ध्येयापर्यंत पोहोचले आहेत तिथपर्यंत जाणारा प्रवास अत्यंत चढ-उतारांचा, खाचखळग्यांचा, परीक्षा पाहणारा तर होताच; पण खूपदा प्रोत्साहित करणाराही होता. 'मिरॅकल मस्ती', 'मिरॅकल मसाला' या कार्यक्रमांदरम्यानच्या आठवणीमध्ये रमताना रज्जाक सांगतात :  “२८ डिसेंबर २००७ रोजी सुरू झालेला 'मिरॅकल मस्ती' हा दर शुक्रवारी प्रसारित होणारा १५ मिनिटांचा कार्यक्रम. मी 'राही' या नावाने आणि वृषाली 'दिशा' या नावाने श्रोत्यांना भेटायचो. यादरम्यान एकदा वृषाली खूप आजारी पडली. तिला दवाखान्यात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली. शुक्रवार जवळ येऊ लागला तसतशी वृषालीची तगमग वाढू लागली. श्रोत्यांसोबतची ॲटॅचमेंट तिला बेचैन करू लागली. तिने विचार केला : 'शो मस्ट गो ऑन एअर'. मग सुरू झाली डॉक्टरांची मनधरणी. डॉक्टर परिचित असले तरी त्यांना तिच्या प्रकृतीची काळजी जास्त असणे स्वाभाविकच होते; पण शेवटी डॉक्टरांना राजी करण्यात वृषाली यशस्वी झाली. डॉक्टरांनी अत्यंत नाखुशीनेच दिलेली एक-दीड तासाची परवानगी घेऊन रिक्षाने आम्ही स्टुडिओ गाठला. तिथे वृषालीने आरामखुर्चीवर पडूनच अत्यंत प्रभावशाली सादरीकरण केले. शो एअरवर गेला. संपला.


नेहमीप्रमाणे श्रोत्यांच्या फोन कॉल्सचा पाऊस सुरू झाला. एकीकडे वृषालीच्या डोळ्यांतून घळघळा वाहणाऱ्या अश्रुधारांतून श्रोत्यांवरचे प्रेम व्यक्त होत होते आणि सोबत सुरू होता असंख्य चाहत्यांसोबत सुखसंवाद. त्यात आजाराची जाणीव कुठल्या कुठे पळून गेली."


रज्जाक म्हणतो, “एवढे नक्की आहे की, ही वाटचाल सोपी नव्हती. 'अपंग-सदृढ', 'आंतरधर्मीय' अशी विशेषणे या लग्नाला लाभलेली असल्याने अनेक हितचिंतकांनी ‘सुखाने नांदा' हा आशीर्वाद मनापासून दिला, तसेच दोघांकडच्या काही हितशत्रूंनी 'पाहू किती दिवस जमतंय', असं म्हणून नाकही मुरडले. मात्र, गेल्या २७ जुलैला लग्नाचा सोळावा वाढदिवस मित्रमंडळींसमवेत मोठ्या उत्साहात साजरा केला. या सहजीवनाचा आनंद आम्ही निरंतर घेत आहोत. हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही आम्ही आमच्या श्रोत्या-मित्रांसोबतच साजरा केला होता.”


तर, वृषाली म्हणते, “रज्जाकने लिहिलेल्या प्रायोजनमूलक हिंदीच्या पेपरमध्ये 'जाहिरात तयार करा', असा एक प्रश्न होता. मी एका केशतेलाची जाहिरात रज्जाकला डिक्टेट करून तयार केली आणि आज आमच्या 'मिरॅकल ॲड एजन्सी'च्या माध्यमातून आम्ही जाहिरातीच तयार करत आहोत. आज रेडिओच्या 'मिरॅकल मस्ती', 'मिरॅकल मसाला', 'ज्ञानरंगोली', 'फैशन धमाका', 'मैत्री तुमची-आमची' अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा 'मिरॅकल-परिवार' लाभला आहे. लग्नाआधी मी, आकाशवाणीचा निवेदक असलेल्या रज्जाकची फॅन होते. (त्याच्या अनेक कार्यक्रमांचे ऑडिओ कॅसेट्समध्ये मी रेकॉर्डिंग करून ठेवलेय). आणि, आज आम्हा दोघांचे मिळून असंख्य फॅन आहेत.”


पत्रिकेच्या अंधश्रद्धेबाबत भाष्य करताना ते दोघेही म्हणतात, “आमचे पत्रिकेबाहेरचे अनेक गुण जुळले. काव्य, वृत्तनिवेदन, सामाजिक कार्य अशा अनेक गोष्टींत आम्हा दोघांनाही समान रस आहे. काही स्वतंत्र गुणही आहेत." रज्जाकबाबत व स्वतःबाबत वृषाली म्हणते : "तो एक उत्कृष्ट डॉक्युमेंट्री-मेकर आहे, कॅमेरामन आहे, चित्रकार आहे, पत्रकार आहे; तर मी गायिका, संगीतकार, कॉपीरायटर इत्यादी...”


एखाद्या फिल्मी स्टोरीसारखे ह्या दोघांचे जीवन वाटत असले तरी चित्रपटातल्यासारखे यात खोटे काहीही नाही. दिसत नसल्याने स्वयंपाकाच्या वेळेस बोटाला कापणे- चिरणे, चटके बसणे हे जितके खरे, तितकीच रज्जाकने त्यावर घातलेली प्रेमाची फुंकरही खरी असते. किचनमध्ये रज्जाकची वृषालीला आणि घराबाहेर वृषालीची रज्जाकला मदत असते. त्यांचा जवळपास प्रत्येक निर्णय परस्पर सहमतीने होतो. जीवनात खूप गमतीजमती घडतात. निराश करणारे प्रसंगही येतात; पण अशा वेळी वृषाली तिच्या मनाला स्वतःच्याच शब्दांनी आधार देते.  'जश्न' या तिच्या कवितेत तिने म्हटल्याप्रमाणे :


जिंदगीभर गम से आँखे चुराते ही रहे हम

लाख मुश्किलें आने पर भी मुस्कुराते ही रहे हम

हारना तो हम ने जिंदगी में सीखा ही नही कभी

बरबादियों का भी जश्न मनाते ही रहे हम।