राज्यातल्या 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 8 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मुंबईः मागच्या तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं पुनरागमन झाल्याचं बघायला मिळालं. आता राज्यातल्या काही भागांमध्ये दोन दिवस मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

मध्य पूर्व अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शनिवारी (दि. ३०) रोजी रात्री आणि रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आयएमडीच्या हवाल्याने सतर्क या हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र कोकणामध्ये प्रवेश करणार असल्याने मुसळधार पावसाची शक्यता आहे.

समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून ते पणजी ते रत्नागिरीदरम्यान जमिनीवर प्रवेश करील. त्यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

दरम्यान, मागच्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई, पुणे, मराठवाडा या भागामध्ये पाऊस झाला. दडी मारलेल्या वरुणराजाने तब्बल महिन्याभराने दर्शन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता.