UPSC टॉपर्समध्ये वाढला मुस्लीम टक्का. महाराष्ट्रातील आयेशा काझी आणि सय्यद हुसेन यांनी मिळवले यश!

Story by  Pooja Nayak | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
ठाण्याची आयेशा काझी आणि डोंगरीच्या सय्यद हुसेन यांनी मारली बाजी
ठाण्याची आयेशा काझी आणि डोंगरीच्या सय्यद हुसेन यांनी मारली बाजी

 

केंद्रीय  नागरी सेवा २०२२ चा निकाल २३ मे रोजी जाहीर झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSCने) सप्टेंबर २०२२ मध्ये घेतलेल्या लेखी आणि जानेवारीमध्ये झालेल्या वैयक्तिक मुलाखतीचा निकाल जाहीर झाला. यावेळी तीन मुस्लिम उमेदवारांनी पहिल्या १०० यादीत स्थान मिळवले आहे. त्यात वसीम अहमद भट (AIR ७) नवीद अहसान भट (AIR ८४ ) आणि असद झुबेर (AIR ८६) यांचा समावेश आहे.

यावर्षी एकूण ९३३ पात्र उमेदवारांपैकी २९ मुस्लिम उमेदवारांनी बाजी मारली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी यशस्वी मुस्लिम उमेदवारांची संख्या नऊने वाढली आहे. मागील वर्षी हीच संख्या २१ होती. यावेळी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत मुस्लीम उमेदवारांची कामगिरी मागील वर्षीच्या तुलनेत चांगली राहिली आहे. यावर्षी पहिल्या चार जागांवर महिला उमेदवारांनी आपल्या नावाची मोहर उमटवली. ज्यात इशिता किशोर प्रथम, गरिमा लोहिया द्वितीय,उमा राठी तृतीय, तर स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ उमेदवारांच्या तीन टप्प्यांत वैयक्तिक मुलाखती घेतल्या गेल्या. त्यातील तिसरा आणि अंतिम टप्पा १८ मे २०२३ रोजी संपला. UPSCने जाहीर केलेल्या सिव्हिल सर्व्हिसेस मेन २०२२ च्या निकालानुसार, सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम्स आणि मुख्य परीक्षा यशस्वी झालेल्या सुमारे २५२९ उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी तीन टप्प्यांत बोलावण्यात आले होते. त्यापैकी ८३ उमेदवार मुस्लिम होते.

महाराष्ट्रातून ७० हून अधिक उमेदवार यशस्वी 
लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातून थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल ७० हून अधिक उमेदवारांनी बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मिरा संख्ये राज्यात पहिली असून देशात २५वी आली आहे. आधी हज कमिटीच्या कोचिंग सेंटरमध्ये असलेले आणि २०२१ नंतर मुंबईतील जफर सुलेमान आयएएस संस्थेत तयारी करणाऱ्या आयेशा काझी, सय्यद एम. हुसेन, तस्कीन खान आणि एम. बुरहान जमान यांनीही यशाला गवसणी घातली आहे. 

डोंगरीतील हुसेन याने पाचव्या प्रयत्नात ५७० वा रँक मिळवला तर कळवा, ठाणे इथली आयेशा काझी हिला ५८६वा रँक मिळाला आहे. मूळची उत्तर प्रदेशची असलेली मुंबईची तस्किन खान हिला ७३६वा रँक मिळाला आहे तर मूळचा कोलकाताचा असलेला बुऱ्हाण झमानसुद्धा देशात ७३६वा आला आहे.

जम्मू-काश्मीरमधून १६ विद्यार्थी यशस्वी   
या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधून १६ उमेदवार निवडलेगेले. त्या उमेदवारांमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील डोरू भागातील वसीम अहमद भट हा सातवा क्रमांकवर आहे.वसीम भट यांनी २०२१ मध्ये २२५ वा क्रमांक मिळवला होता. २५ वर्षीय भट यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) श्रीनगरमधून बीटेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) केले आहे. तर पूंछ जिल्ह्यातील प्रसनजीत कौर हिने परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ११ वा क्रमांक पटकावला आहे.२४ वर्षीय प्रसनजीत कौरने जम्मू विद्यापीठातून B.Sc आणि M.Sc केले आहे. 

यापूर्वी यूपीएससी मधील मुस्लिम टक्का
गेल्या वर्षी म्हणजे नागरी सेवा २०२१ मध्ये झालेल्या प्राथमिक आणि मुख्य परीक्षेतून एकूण १८२३ उमेदवार वैयक्तिक मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ६८५  जण गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावण्यात  यशस्वी झाले. त्यापैकी २१ जण मुस्लिम होते. याउलट २०२० मध्ये एकूण ७६१ उमेदवार नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यातील ३१ मुस्लिम होते. २०१९ मध्ये ४२ मुस्लिमांनी परीक्षा उत्तीर्ण केली होती. २०१८ मध्ये केवळ २७ मुस्लिम यूपीएससी मध्ये यशस्वी झाले.

२०१६ आणि २०१७ ही वर्षे मुस्लिम उमेदवारांसाठी सर्वांत यशस्वी ठरली. २०१६ मध्ये ५२ तर २०१७ मध्ये ५० उमेदवार यूपीएससी मध्ये यशस्वी झाले. २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या १०७८ उमेदवारांपैकी ३४ जण मुस्लिम होते. हीच संख्या २०१४ मध्ये ३८ इतकी होती. मात्र गेल्या दशकभराचा आढावा घेतल्यास दिसते की, २०१८ आणि २०२१ च्या तुलनेत हा आकडा अधिक असला तरी २०१६ आणि २०१७ च्या तुलनेत यावेळचा टक्का फारच कमी आहे.

 



UPSC २०२२ च्या गुणवत्ता यादीत झळकलेले मुस्लिम उमेदवार
 
  1. वसीम अहमद भट
  2. नवीद अहसान भट
  3. असद जुबेर
  4. आमिर खान
  5. रोहानी
  6. आयेशा फातिमा
  7. शेख हबीबुल्ला
  8. जुफिशॉन हक
  9. मनन भट
  10. आकिब खान
  11. मोईन अहमद
  12. मोहम्मद इदुल अहमद
  13. अर्शद मुहम्मद
  14.  रशिदा खातून
  15. आयमान रिझवान
  16.  मोहम्मद रिसविन
  17.  मोहम्मद इरफान
  18. सय्यद मोहम्मद हुसेन
  19. काझी आयेशा इब्राहिम
  20. मुहम्मद अफझेल
  21. एस मोहम्मद याकुब
  22.  मोहम्मद शादा
  23.  तस्किन खान
  24.  मोहम्मद सिद्दीक शरीफ
  25.  अखिला बी एस
  26.  एमडी बुरहान जमान
  27. फातिमा हॅरिस
  28.  इराम चौधरी
  29.  शिरीन शहाणा टी के