संविधानातील शंभर कलमं तोंडपाठ असलेली नाशिकची इकरा

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
संविधानातील शंभर कलमं तोंडपाठ असलेली नाशिकची इकरा
संविधानातील शंभर कलमं तोंडपाठ असलेली नाशिकची इकरा

 

संविधानातील शंभर कलमांची माहिती तोंडपाठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवले येथील १० वर्षीय इकरा नाज अजहर शहा हिची ही कथा. इकरा ही इकरा अरबी मदरसा व इंग्लिश मीडियम स्कूल येथे इ. ६ विच्या वर्गात शिकते.

 

“तुला संविधानाचाच अभ्यास करावा असे का वाटले ?” असा सवाल केल्यावर इकरा म्हणते, “माझ्या वडिलांसोबत मी एकदा बातम्या बघत असताना न्यूज चॅनेलवर ‘एनआरसी’ व ‘सिएए’ ही शब्द वाचली आणि वडिलांना विचारले, ‘एनआरसी’ व ‘सिएए’ म्हणजे काय ?, तेव्हा ते म्हणाले, या प्रश्नाचे सखोल उत्तर मिळवायचे असेल तर तू संविधानाचा अभ्यास कर. त्यानंतर मी संविधानाचा अभ्यास सुरु केला आणि हळूहळू त्या अभ्यासात माझा रस वाढू लागला.” इकराला गायन, वाचन, भाषण तसेच, पथनाट्य सादर करण्याची आवड आहे.


इकराचे वडील अजहर शाह हे इकरा अरबी मदरसाचे संस्थापक आहेत. त्यांना पूर्वीपासूनच लिखाण व वाचनाची आवड आहे. त्यांच्यामुळेच इकराला अवांतर वाचनाचीदेखील आवड लागली. इकरा म्हणते, “संविधानामुळेच आपल्याला हक्क व अधिकार मिळाले आहेत. त्यामुळेच आज आपण आपले मत व विचार मांडू शकतो. त्याचबरोबर मुलींच्या स्वप्नांना बळ देण्याचे कामही संविधानाने केले आहे.” इ. २ रीच्या वर्गात शिकणारी ८ वर्षीय जीकरा (इकराची लहान बहिण) हिला देखील कविता लिहिण्याची व गाण्याची आवड आहे.


एकदा इकराचे वडील तिला राष्ट्र सेवा दलाच्यावतीने आयोजित ‘संविधान मैदान’ या कार्यक्रमासाठी नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे घेऊन गेले. या उपक्रमांतर्गत सेवा दलाचे कार्यकर्ते अर्जुन कोकाटे व शरद शेजवळ हे दर शुक्रवारी महात्मा फुलेंचे अखंड, वामनदादा कर्डक यांच्या कविता गात. त्या कविता, प्रार्थना आणि अखंड यांच्याकडे ती फार आकर्षित झाली आणि आपणही आपल्या देशासाठी, समाजासाठी काहीतरी लिहावे, असे तिला वाटू लागले. तिने कविता लिहिण्यास सुरवात केली. २६ जानेवारी २०२३ रोजी एका कार्यक्रमात सादर केलेल्या इकराच्या पहिल्या कवितेतील काही ओळी पुढीलप्रमाणे.     


"सबसे प्यारा हिंदोस्ता हमारा...

देश है निराला... हरीयालीसे भरा देश है हमारा...

भारत में रहते है लोग प्यारे प्यारे...

इस देश में है कई सितारे...

भारत में निकलता प्यारा सूरज है...

इस देश में वीर जवान रहते है...  

सबसे प्यारा हिंदोस्ता हमारा है !"


इकरा म्हणते,“संविधानाचा पूर्ण अभ्यास करून संविधानाने बहाल केलेला प्रत्येक घटक मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल. राज्यघटनेला घरा-घरापर्यंत पोहोचवणे, हि आपली सर्वांची जबाबदारी आहे. भारतीय संविधानाबाबत लोकांमध्ये अनेक भ्रम आहेत ते दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल. तसेच, अनुच्छेद क्रमांक २५ मध्ये धर्म स्वातंत्र्याचे अधिकार व अनुच्छेद क्रमांक ३० मध्ये अल्पसंख्याकांना जे अधिकार देण्यात आले आहेत त्याबद्दल जागरूकता निर्माण करेल. संविधान हा विषय प्रत्येक शाळेत बालवयातच शिकवला जावा, असे मला वाटते.”

 

तर, इकराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? असा सवाल केल्यावर इकराची आई रेशमा शाह म्हणाल्या, “मला ईकराकडून एकच अपेक्षा आहे कि,तिने राष्ट्राच्या एकता व एकात्मतेसाठी आपले योगदान द्यावे. संविधानाचे पूर्ण अभ्यास करून तळागाळापर्यंत त्याचा प्रसार करावा. तसेच, विशेष करून महिलांना त्यांचे अधिकार व कर्तव्य यांच्याबद्दल मार्गदर्शन करावे. भविष्यात एक संविधान अभ्यासक म्हणून तिचे नाव व्हावे. स्त्री जीवन जगताना तिला तिच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याचे पूर्ण भान असावे. मुस्लिम समाजामध्ये काही लोक स्वत:च्या स्वार्थासाठी ज्या अंधश्रद्धा पसरवतात त्याचा विरोध करून संविधानाला अनुसरून असलेले धार्मिक हक्क मुस्लिम महिलांना मिळवून द्यायला हवे.”

 

तर,  “समाजामध्ये संविधान घराघरांत पोहोचविण्याचे काम इकराने करावे. कारण जनजागृतीची आपल्या समाजाला फार गरज आहे. संविधान माणसाला माणसासारखे जगण्याची प्रेरणा देतो. त्याचबरोबर, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे. या संस्कृतीत माझ्या दोघी मुली संविधानाला अनुसरून जनजागृतीचे काम करतील, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. विशेष करून मुस्लीम समाजात संविधानाची मुळे रुजविण्यासाठी त्यांना आम्ही हिंदीमध्येही प्रशिक्षण देत आहोत,” असे अजहर शाह म्हणाले.

 

इकराने २६ नोव्हेबर संविधान दिनानिमित्त संविधानावरदेखील कविता लिहिली आहे. त्यातील काही ओळी पुढीलप्रमाणे.


"संविधान... संविधान... तुमने दिये सारे अधिकार...

तुम्ही पर चलता है सारा हिंदुस्थान...!"