बारामतीच्या करिश्मा इनामदारची अवकाश भरारी

Story by  Sameer D. Shaikh | Published by  sameer shaikh • 6 Months ago
स्पेस रोबोटीसिस्ट करिश्मा इनामदार
स्पेस रोबोटीसिस्ट करिश्मा इनामदार

 

अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या करिश्मा इनामदार यांचा प्रेरणादायी प्रवास...
 
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीने थेट 'नासा'पर्यंत मजल कशी मारली? जाणून घ्या या विशेष लेखातून
 
वर्ष होते 2003. फेब्रुवारीची एक तारीख. भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला तिच्या सहा सहाकाऱ्यांसह अंतराळातून पृथ्वीवर परतणार होती. अंतराळात जाणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. तिचा पृथ्वीकडील प्रवास सुरू झाला होता. अचानक तिच्या अंतराळयानाने पेट घेतला. या दुर्घटनेत कल्पना आणि तिच्या सहकाऱ्यांचे निधन झाले. बारामतीमधील ११ वर्षांची करिश्मा हे सगळं टीव्हीवर पाहात होती.
 
‘आपण अंतराळात जाऊ शकतो’ हे छोट्या करिश्माला पहिल्यांदाच कळालं होतं. आपणही कल्पना चावलाप्रमाणे आकाशात जायचं, अंतराळवीर व्हायचं अशी पक्की खुणगाठ तिने मनाशी बांधली. करिश्मा म्हणते, “ कल्पना चावला यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. मात्र मला आणि माझ्यासारख्या लाखो मुलींना अंतराळवीर बनण्याचे स्वप्न त्या देऊन गेल्या होत्या. आता अंतराळाशी संबंधित काहीतरी करायचंच याचं मला जणू वेडच लागलं होतं.”

ईदला चंद्र पाहण्याला विशेष महत्त्व असल्यामुळे करिश्माला लहानपणापासूनच चंद्राचं आकर्षण होतं. आता तिला पायवाट मिळाली होती, चंद्रापर्यंत जाण्याची. ती म्हणते, “ अंतराळवीर व्हायचं माझं स्वप्न मी पहिल्यांदा पप्पांना बोलून दाखवलं. या संबंधित काही कुठे वाचायला मिळतंय का, याच्या मी मागावरच असायचे. आई-वडीलही मग मला काहीनकाही वाचायला आणून द्यायचे. बारामतीत त्यावेळी ‘एस्ट्रोनॉट्स क्लब’ वगैरे काही नव्हतं. पुण्यात ‘आयुका’ वगैरे संस्था असल्याचं मला कळलं होतं. त्यामुळे आई-वडिलांकडे मी पुण्याला जाण्याचा तगादा लावायचे.”

‘तुम अगर किसी चीज को शिद्द्त से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उस से मिलाने में लग जाती है’ असं शाहरुख त्याच्या ‘ओम शांती ओम’ या सिनेमात म्हणतो. घडलंही अगदी तसंच. करिश्माला अंतराळ विश्वाविषयी अधिक माहिती मिळवण्याचे वेध लागले. त्यासाठी ती शिद्द्तने प्रयत्नही करत होती. अशातच बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. देशभरातील महत्त्वाच्या तज्ज्ञ व्यक्ती या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होत्या. त्यात एका व्याख्यानासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर येणार असल्याचे वडलांनी करिश्माला सांगितले. करिश्माचा तर विश्वासच बसेना. तिथे जाऊन नारळीकरांना भेटायचं, त्यांच्याशी काय बोलायचं याची तिने तयारीही सुरू केली.

व्याख्यानमालेच्या दिवशी करिश्मा आपल्या आई-वडिलांसह कार्यक्रमाला येऊन बसली. ती प्रचंड एक्साईटेड होती. ज्या व्यक्तीसाठी पुण्याला जायचं होतं ती व्यक्ती स्वतः तिच्या गावी आली होती. व्याख्यान संपलं आणि उपस्थितांनी डॉ. नारळीकर यांना गराडा घातला. छोटीसी करिश्मा बाजूला पडली. तिला मोठ्यांचं चक्र भेदता येईना. हा प्रसंग आठवताना ती म्हणते, “मी अगदीच लहान होते. डॉ. नारळीकरांना मोठ्यांचा गराडा पडला होता. त्याला भेदून डॉ. नारळीकरांपर्यंत जाणं अगदीच अशक्य होतं. मी काहीशा निराशानेच बाजूला थांबले होते. डॉ. नारळीकर निघाले. जाता-जाता त्यांची नजर माझ्यावर पडली. मी त्यांना हात दाखवला. ते थांबले आणि म्हणाले तुला जर काही प्रश्न असेल तर तो एका चिठ्ठीवर लिहून दे आणि खाली तुझा पत्ता लिही.”

करिश्मा पुढे सांगते, “मी लगेच पप्पांकडून पेन आणि कागद घेतला आणि त्याच्यावर ‘ब्लॅक होल’विषयी एक प्रश्न लिहिला, खाली स्वतःचा पत्ता लिहिला आणि ती चिठ्ठी डॉ. नारळीकरांकडे दिली. इतके मोठे शास्त्रज्ञ आपल्यासारख्या लहान मुलीची चिट्ठी स्वतः जवळ जपून ठेवतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. दोन-तीन महिने उलटले. डॉक्टर नारळीकरांचे उत्तर येणार नाही हे माहीत होतं, मनात मात्र थोडीशी आस लागून राहिली होती. आणि एक दिवस अचानक माझ्या घरच्या पत्त्यावर डॉक्टरांचे पत्र आले. माझा आनंद तर गगनात मावेना. पत्र उघडून बघितलं तर त्यांनी ब्लॅक होल विषयीच्या माझ्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलं होतं. पण पत्रात त्याहून महत्त्वाचंही आणखी काहीतरी होतं. ते म्हणजे त्यांनी दिलेला सल्ला आणि केलेले मार्गदर्शन. माझ्या आवडीच्या विषयाशी संबंधित माझी उत्सुकता मी कशी शमवावी याविषयी त्यांनी मला मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळी गुगलची नवीनच ओळख झालेली होती. त्याचा वापर करून मी याविषयीचं अधिकाधिक ज्ञान कसं मिळवू शकते याविषयी त्यांनी मला या पत्रात सांगितलं होतं. त्यांच्या पत्राने मी भारावून गेले. मला एक स्पष्ट दिशा मिळाली आणि माझा आत्मविश्वासही वाढला होता. आता याच दिशेने पुढं जायचं हे मी ठरवलं होतं.”

आई- वडील आणि तीन भावंडं असा करिश्माचा छोटेखानी परिवार. भावंडांमध्ये ती सगळ्यात मोठी. तिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले. पुढे तिने ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन’मधून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. अभ्यास हा केवळ परीक्षेत गुण मिळवण्यापुरताच करणं तिला मान्य नव्हतं. ज्ञान मिळवणं आणि ते अप्लाय करणं याकडे तिचा कल होता. एका संशोधकाच्या ठाई असणारे सगळे गुण करिश्मा मध्ये होते. 

डॉ. आंबेडकर आपल्या एका लेखात म्हणतात, 'इन स्टडी यू मस्ट बी नॅरो माइंडेड' म्हणजे संशोधन करताना तुम्ही एका छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. करिश्मानेही हेच केले. लहानपणी पाहिलेल्या स्वप्नाच्या दिशेने जाण्यासाठी ती अगदी नियोजनबद्ध पद्धतीने आणि सातत्याने पाऊले टाकत गेली. 

आयआयटी खडकपूरमध्ये होणाऱ्या स्पेस चॅलेंज स्पर्धेवर ती बारीक लक्ष ठेवून असायची. ती म्हणते, “या स्पर्धेत अनेक संशोधक आणि वैज्ञानिक आपापले शोधनिबंध सादर करायचे. त्यात त्यांचे ईमेल आयडी दिलेले असायचे. ते ईमेल आयडी मी नोंदवून ठेवायचे आणि या संशोधकांना माझ्या मनातील प्रश्न विचारायचे. मात्र मी मोघम प्रश्न विचारत नव्हते. ‘मला अंतराळवीर व्हायचे आहे तर मी काय करू?’  अशा प्रश्नांना संशोधक उत्तर देत नाहीत, याची मला कल्पना होती. म्हणून मी त्यांना फार स्पेसिफिक प्रश्न विचारायचे. ‘अंतराळातील कचरा’ याविषयी वाचायला आणि त्यावर उपाय शोधायला मला आवडायचे. तर मी त्याविषयीचे प्रश्न विचारायचे. माझ्या प्रश्नांना हे संशोधक अगदी सविस्तरपणे उत्तर द्यायचे. या संवादातून मला खूप ज्ञान मिळाले.”

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच आयआयटी खडकपूर मध्ये करिश्माने आपला शोध निबंध सादर केला. त्यानंतर फ्रान्समधील अंतराळ संशोधनासाठी वाहून घेतलेल्या प्रतिष्ठित अशा ‘इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’च्या फेलोशिपसाठी तिने अर्ज केला. इंजीनियरिंगची शेवटची सेमिस्टर सुरू असताना या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून फेलोशिप मिळवण्यात तिला यश मिळाले. उच्च शिक्षणासाठी या विद्यापीठाकडून तिची निवड करण्यात आली होती. आजवर बारामतीच्या बाहेरही न गेलेल्या करिश्माला घरचे उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवतील का याबाबत तिच्या मनात धाकधूकच होती. ते तयार झाले तरी प्रवास आणि फी यांसाठी मोठी रक्कम उभी करावी लागणार होती. मध्यमवर्गीय इनामदार कुटुंबियांसाठी हे मोठे आव्हानच होते.  

आपली मोठी स्वप्नं साकार करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या मुलींसमोर अडथळेही तितकेच मोठे असतात. मुलीच्या आई-वडिलांवर नातेवाईकांचा - समाजाचा मोठा दबाव असतो. तसाच करिश्मा आणि तिच्या पालकांवरही होता. ‘करिश्मा आता इंजिनियर झाली आहे. तिने लग्न करावे सेटल व्हावे आणि मग खुशाल नोकरी करावी’ अशा उपदेश वजा सूचना कानावर येत होत्या. त्याविषयीही घरात दबकी का होईना चर्चाही सुरु होती. 

लहानपणापासून जे स्वप्न पाहात करिश्मा जगली, ते स्वप्न सत्यात उतरवण्याची मोठी संधी चालून आली होती. काही केल्या ही संधी तिला जाऊ द्यायची नव्हती. घरातल्या घरातच तिने आपल्या वडलांना पत्र लिहिले. त्यात तिने लिहिले, ‘मला उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ द्या. लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न साकारू द्या. हे स्वप्नं माझ्या एकटीनेच नव्हे तर आपण सगळ्यांनी पाहिले होते. तुमच्या आजवरच्या पाठबळामुळेच मी हे यश मिळवू शकले आहे. आता माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आहे, यावेळीही माझ्या पाठीशी उभे रहा. हवं तर परत आल्यावर तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मी लग्न करेन, अगदी त्याचा चेहरा न बघताही!’ करिश्माचे पत्र वाचून वडलांना रडू कोसळले. 

आईला समजावणेही सोपे नव्हते. करिश्मा म्हणते, “मी आईसमोर जाऊन बसले. आपल्याला निर्णय घ्यायला फार कमी वेळ उरला आहे याची मी तिला जाणीव करून दिली.  मी सुद्धा फार भावनिक झाले होते. तब्बल तीन तास मी तिच्या समोर बसून रडत होते आणि तिला समजावून सांगत होते. आखिर उसका दिल भी पीघल गया. दोघांना पटवून द्यायला मला दोन महिने लागले पण मी माझी चिकाटी सोडली नाही.”

आई-वडिलांची संमती मिळाली असली तरी करिश्मा समोरचे अडथळे संपले नव्हते. परदेशी विद्यापीठामध्ये मास्टर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी फेलोशिप मिळाली असली तरी ती अंशतःच होती. त्यामुळे जाण्यापूर्वी तिला मोठी रक्कम उभी करावी लागणार होती. इनामदार कुटुंबीयांकडे इतके पैसे नव्हते. नोकरदार वडलांनी आपल्या मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे दोन गुंठ्यांचा जमिनीचा तुकडा होता. लेकीच्या शिक्षणासाठी त्यांनी तो विकला. मात्र तरीही अजून मोठी रक्कम उभी करावी लागणार होती. करिश्मा म्हणते, “आमचा प्लॉट विकूनही अपेक्षित रक्कम उभी राहिली नव्हती. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना ही बाब कळाली. शरद पवार यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली. त्यांच्यामुळेच ही उर्वरित रक्कम जमा झाली.”     

पै पै जमा करून आपण उच्च शिक्षणासाठी फ्रान्सला आलो असल्याची करिश्माला कायमच जाणीव होती. ती म्हणते, “फ्रान्सला गेल्यावर क्षणोक्षणी मला या गोष्टींची जाणीव व्हायची. जीवनावश्यक वस्तू खरेदी करतानाही जास्तीत जास्त पैसे कसे वाचतील याकडे माझा कल असायचा. आपण अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून, संशोधन करून आई-वडिलांचे पांग फेडायचे आहे हे मी स्वतःला कायम सांगायचे. त्यासाठी प्रचंड मेहनतीही करायचे.”

‘इंटरनॅशनल स्पेस युनिव्हर्सिटी’मधून उच्च शिक्षण घेत असतानाच अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था अर्थातच ‘नासा’ या जगप्रसिद्ध संस्थेत संशोधक सहाय्यक म्हणून काम करण्याची करिश्माला संधी मिळाली. याविषयी ती म्हणते, “ माझ्याकडे एकाच वेळी दोन मोठ्या ऑफर्स होत्या. एक म्हणजे नासा आणि दुसरी जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था डीएलआर. अंतराळविषयक जगातली प्रतिष्ठित संस्था म्हणून ‘डीएलआर’चा लौकिक आहे. मी दोन्ही संधी तपासून पाहिल्या आणि ‘डीएलआर’मध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. माझ्या या निर्णयाचा माझ्या मित्रमंडळींना धक्का बसला. ‘नासा’मध्ये जाण्याची संधी मी नाकारू नये असं त्यांचं मत होतं. मात्र मला ज्या विषयात संशोधन करायचे होते त्याला ‘डीएलआर’मध्ये अधिक वाव होता. त्यामुळे पहिल्यांदा मी नासाची ऑफर सरळ नाकारली होती. मात्र ‘डीएलआर’मध्ये कागदपत्रे सादर करायला माझ्या विद्यापीठाने उशीर केल्यामुळे मला तिथे प्रवेश घेता आला नाही, आणि नाईलाजाने मला नासामध्ये प्रवेश घ्यावा लागला.”

‘नासा’मध्ये संशोधक सहाय्यक म्हणून रुजू झालेल्या करिश्मासमोर नवीन विश्व खुले झाले होते. आजवर ज्यांची नावे फक्त पुस्तकात वाचली होती त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून संशोधन करण्याची तिला संधी मिळाली. या अनुभवाविषयी ती म्हणते, “मी नवीन प्रवेश घेतलाय, अजून शिकते आहे याची जाणीव मला माझ्या वरिष्ठांनी कधीही होऊ दिली नाही. प्रत्येक संशोधनाच्या वेळी ते मला माझे मत विचारायचे. या गोष्टीने मला प्रचंड आत्मविश्वास दिला.”
 
करिश्मा आता ‘स्पेस रोबोटीसिस्ट’ म्हणून कार्यरत आहे. पण अंतराळवीर होण्याचे स्वप्नं तिला अजूनही खुणावते आहे. ती म्हणते, “जसजशी मी अधिकाधिक संशोधन करू लागले तसं मला जाणवलं की ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. फिल्मी भाषेत बोलायचं झालं तर हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून बाकी आहे. मला स्वतःचं एक्सपर्टीज तयार करायचे आहे. अंतराळवीर होण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. त्या दिशेने मी पावलेही टाकत आहे. मी काही पायलट ट्रेनिंग पूर्ण केले आहेत. अंतराळवीर होण्यासाठी लागणारा अभ्यासही मी करते आहे. पुढची दोन-तीन वर्षे माझ्यासाठी फार महत्त्वाची आहेत. त्यानंतर लहानपणापासून पाहिलेले स्वप्न सत्यात उतरणार आहे.”

आई-वडलांच्या भक्कम पाठींब्यामुळेच इथपर्यंतचा प्रवास करू शकल्याचे करिश्मा आवर्जून सांगते. करिश्माची आई गृहिणी. वडील सल्लाहुद्दिन इनामदार खाजगी महाविद्यालयात सिनियर क्लार्क आहेत. ते म्हणतात, “करिश्माने सातवी आठवीपासूनच तिचं ध्येय निश्चित केलं होतं. ती फार प्रामाणिकपणे कष्ट घेत होती. आम्ही आई- बाप त्याचे साक्षीदार आहोत. त्यामुळे तिचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वस्व पणाला लावायची आमची तयारी होती. ती पुण्यात यायचा हट्ट करायची तेव्हा मी तिला घेऊन पुण्यात यायचो. आझम कॅम्पसमध्ये विज्ञान प्रदर्शन लागायचे, तिथे घेऊन जायचो. यात करिश्माच्या आईचीही मोठी भूमिका आहे. मुलीला काय हवे नको ते तिने पाहिले. त्याबाबत ती कायम जागरूक राहिली.”     
 
कल्पना चावलाकडून अंतराळवीर बनण्याची प्रेरणा घेणारी करिश्मा आता स्वतः अनेक मुलींसाठी प्रेरणास्थान बनली आहे. ती बारामतीला आपल्या गावी येते तेव्हा तिच्याभोवती लहानग्यांचा आणि तरुणाईचा गराडा पडतो. या अनुभवाविषयी ती म्हणते, “ मी गावी आल्याचे कळताच, अनेक जण मला आवर्जून भेटायला येतात. त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त असतं. ‘मलाही तुझ्यासारखं संशोधक व्हायचय’ असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक मला आनंदित आणि आश्वस्त करते. मी त्यांची फेवरेट दीदी आहे. मी फार मोठी संशोधक नाही, मात्र माझ्या परीने जमेल तसे नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. त्यांची उत्सुकता कायम राहील मात्र पुढे जाण्याच्या दृष्टीने पायवाट करून देण्याचा प्रयत्न मी करते. लहान मुलांचे मन जगाकडे कुतुहलाने पाहते. त्यांना अनेक गोष्टींविषयी जाणून घ्यायचे असते. पण बरेचदा त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ती ठिणगी विझून जाते. पण योग्यवेळी मार्गदर्शन मिळाले तर या ठिणगीचे धगधगत्या ज्वालेत रुपांतर होऊ शकते. त्यामुळे लहान वयातच योग्य मार्गदर्शनाची आणि मार्गदर्शकाची गरज असते. आज मी जी काही आहे ते माझ्या मार्गदर्शकांमुळेच आहे.”

करिश्मा याविषयी फक्त मत व्यक्त करून थांबली नाही. अंतराळाविषयी उत्सुकता असणाऱ्या भारतातल्या नव्या पिढीसाठी तिने ‘ऑनलाईन स्पेस प्रोग्राम’ची सुरुवात केली आहे.  तिने आपल्या काही संशोधक सहकाऱ्यांसह ‘द नेक्स्ट स्पेस जनरेशन’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमाविषयी ती म्हणते, “परदेशामध्ये लहान मुलांचे अंतराळाविषयी कुतूहल शमवणाऱ्या, त्यांना लहानपणापासूनच मार्गदर्शन आणि प्रोत्साहित करणाऱ्या अनेक संस्था, उपक्रम असतात. भारतात मात्र अशा उपक्रमांची वानवा आहे. यामुळेच आम्ही ‘द नेक्स्ट स्पेस जनरेशन’ हा कार्यक्रम तयार केला. त्याची स्वतंत्र वेबसाईट केली. या उपक्रमाद्वारे आम्ही मुला-मुलींना अंतराळाविषयी माहिती देतो. त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम करवून घेतो. सामाजिक दायित्व म्हणून राबवल्या जाणाऱ्या आमच्या या उपक्रमाला देशभरातील मुला-मुलींकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.” 
 
बारामतीसारख्या भागातील एक मुलगी आपल्या स्वप्नांवर स्वार होऊन अमेरिकेमध्ये अंतराळ संशोधक म्हणून काम करते ही बाब सर्वांसाठीच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी  म्हणावी अशी आहे. मुस्लीम समाजाची पार्श्वभूमी असलेल्या करिश्माला या प्रवासात घरातून किंवा समाजातून विरोधाचा सामना करावा लागला असेल असेल अनेकांना वाटते. याविषयी तिने मांडलेले मत महत्त्वाचे आहे. ती म्हणते, “आपल्याकडे मुस्लिम समाजाची एक साचेबद्ध प्रतिमा तयार झाली आहे. मुस्लिम मुलगी म्हटलं की बुर्का घालते आणि घराच्या आत बंदिस्त असते, असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आपण सर्वांनी या साचेबद्ध मानसिकतेतून बाहेर यायला हवं. मी धार्मिक मुस्लीम कौटुंबिक पार्श्वभूमीतून येते. मी स्वतः धार्मिक वृत्तीची आहे. मी आणि माझ्या कुटुंबीयांनी धर्माचा सखोल अभ्यास केला आहे. ‘शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला खस्ता खात चीनपर्यंत जावे लागले तरी जरूर जा’ असा आदेश इस्लामने दिला आहे. त्यामुळे आपल्या मुलीला उच्च शिक्षण घेण्यापासून रोखणं म्हणजे पाप आहे, अशीच माझ्या कुटुंबीयांची भावना होती. त्यामुळे उलट या धार्मिक संकल्पनेने माझी वाट सुकर केली.” 

याविषयी करिश्माचे बाबा म्हणतात, “आम्ही कधीच मुलगा मुलगी असा भेद केला नाही. माझा धर्म असा भेदभाव करण्यापासून रोखतो. उलट आपल्या मुलांना उत्तम इल्म म्हणजे ज्ञान द्या असा आदेश तो देतो. त्यामुळे तिन्ही मुलांना आम्ही उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.” करिश्माच्या दोन भावंडांपैकी बहिण बेनझीरही उच्च शिक्षित आहे. तिने एम.ई. (मास्टर्स इन इंजिनियरिंग) केले असून ती पुण्यात नोकरीला आहे. तर भाऊ जमीर पदवीचे शिक्षण घेत आहे. 

मुलींच्या शिक्षणाविषयी करिश्मा म्हणते, “मुलगी कोणत्याही धर्माची असली तरी तिच्या समोरची आव्हाने सारखीच असतात. त्यामुळे मुलींना अधिक मेहनत घ्यावी लागते. मलाही घ्यावी लागली. आपल्याला मिळणारे यश हे आपल्या विरोधकांना दिलेले सर्वांत मोठे उत्तर असते. आपण आपल्या कुटुंबीयांना समजावून आणि पटवून दिली की आपण अर्धी लढाई जिंकतो. त्यामुळे मुलींनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्या दिशेने सातत्याने पावले टाकली पाहिजेत. पालकांनीही आपल्या मुलींना त्यांच्या पारंपारिक ज्ञानावरून जज करू नये. तो त्यांच्यावर अन्याय करणारा ठरेल असं मला वाटतं. त्यांनी आपल्या मुलींना मोकळे आकाश द्यावे, मग पहा ती कशी उंचच उंच भरारी मारते ते!” 

करिश्माच्या कर्तुत्वाचा तिच्या पालकांना प्रचंड अभिमान आहे. तिचे वडील म्हणतात, “आमच्या नात्यातलीच एक मुलगी ‘मुझे करिश्मा दीदी जैसा कुछ बनके दिखाना है’ असं म्हणायची. नुकतीच ती न्यायाधीश झाली आहे. करिश्मापासून प्रेरणा घेऊन ओळखीतल्या अशा अनेक मुली उच्च शिक्षण घेत आहेत, मोठी स्वप्नं बघताहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेताहेत.” 

“आज आम्ही जिथे जातो तिथे आम्हा नवरा बायकोला करिश्माचे आई बाप म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या मुलांच्या नावाने ओळखले जातोय याहून मोठा आनंद तो काय असेल?” हे सांगताना करिश्माच्या वडिलांचा गळा दाटून आला होता. 

- समीर दि. शेख 
[email protected]

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter