प्रश्न मासिक पाळीतील मानसिक स्वातंत्र्याचा

Story by  Chhaya Kavire | Published by  Chhaya Kavire • 11 Months ago
स्त्रियांच्या मानसिक स्वातंत्र्याच काय?
स्त्रियांच्या मानसिक स्वातंत्र्याच काय?

 

पाळीच्या रक्तस्रावाला शारीरिक संबंधांची खूण समजत संशय घेऊन १२ वर्षांच्या बहिणीची सख्ख्या भावाने हत्या केली. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे गेल्या आठवड्यात घडली. मुलीची पहिलीच पाळी असल्याने, हे रक्त कशाचे आहे, हे तिलाही माहीत नव्हते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या हृदयद्रावक घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आवाज मराठी’वर मासिक पाळीविषयी प्रबोधन करणारे लेख प्रसिध्द होणार आहेत. त्यापैकीच हा एक लेख : प्रश्न मासिक पाळीतील मानसिक स्वातंत्र्याचा.
---------------------------------------------------------------------

शहरी प्रागतिक विचारसरणी अद्याप ग्रामीण भागात पोहचलेली नाही. त्यामुळे मासिक पाळी आणि स्त्रियांच्या अन्य प्रश्नांकडे पाहण्याची मानसिकता अद्यापही उपेक्षेची आणि तिरस्काराची आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत तरी तिने या जोखडाबाहेर पडून स्वत्वाची जाणिव ठेवून वाटचाल केली पाहिजे.

-छाया काविरे ([email protected])

रात्री उशिरापर्यंत 'नदी का पहाड' हा खेळ खेळत बसल्यामुळं मी दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले; तेही आई ओरडल्यावर. आणि शाळेत जाण्यासाठी आवरायला लागले. आंघोळीला गेले आणि माझ्या कपड्यांना रक्त लागलंय हे बघून प्रचंड घाबरले. आरडाओरडा करू लागले. आजी पटकन उठून माझ्याजवळ आली. 'काय झालं?' असं आईनं लांबूनच विचारलं; पण आजीनं तिला माझ्या जवळूनच ओरडून काही सांगितलं नाही. आई आम्हा दोघींपाशी आल्यावर आजीनं तिला हळूच सांगितलं : "तिला पाळी आलीय!''

'ती बाहेरून झालीय', 'तिचं डोकं मळलंय' अशी सांकेतिक वाक्यं यासंदर्भात ऐकली की माझ्या प्रश्नांचा भडिमार आईवर सुरू व्हायचा. "आई, 'बाहेरून झालीय' म्हणजे काय? मी तर कालच केस धुतलेत; पण तरीही 'हिचं डोकं मळलंय,' असं आजी का म्हणाली? आता माझं डोकं रोज मळणार का?' 'आता पाळी रोज येणार का? माझं रोज रक्त वाहणार का?'अशा अनेक प्रश्नांचा गुंता माझ्या मनात होत असे. आजी-आई-काकूनं माझं खेळणं, मोठ्यानं हसणं, धावणं-पळणं 'त्या' दिवसानंतर बंद केलं. जुन्या बाजारातून आणलेला माझा आवडता फ्रॉकही घालायला मला मनाई करण्यात आली व पंजाबी ड्रेस सक्तीचा करण्यात  आला. ओढणीसह! 'आता तू 'मोठी' झाली आहेस,' हे त्यांनीच मनोमन ठरवलं आणि ते माझ्यावर लादलंही. पाळीच्या त्या चार-पाच दिवसांत मी कुठं बसावं हेही ठरवण्यात आलं. घरातला एक कोपरा! 'पाचव्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची आणि मगच सर्व वस्तूंना स्पर्श करायचा,' असं मला बजावण्यात आलं. 

दर गुरुवारी काकूचा उपवास असायचा. तिला वाचता येत नसल्यानं ती मला देवीची पोथी वाचायला बसवायची; पण पाळी आल्यावर हा नित्यनेम बदलला. 'पोथीला हात लावायचा नाही,' असं आजीनं मला निक्षून सांगितलं. अशा वेळी प्रश्न पडायचा... 'पाळी आल्यावर पोथीला हात लावायचा नाही; मग शाळेतल्या विज्ञान-गणिताच्या पुस्तकांना हात लावलेला चालतो का? आणि नसेल चालत तर, पाळीच्या पाच दिवसांत माझा अभ्यास कसा होणार? दर महिन्याला पाच दिवस शाळा बुडाली तर मी मोठी व्यक्ती कशी होणार?' सुरुवातीला पाळीच्या काळात घरात उदबत्ती लावली की 'देवाला चालत नाही,' म्हणून आई ओरडायची; पण त्यावरही माझे प्रश्न तयारच असायचे : "देवाला जन्म देणारी एक बाईच असेल ना? देवालापण आई असेलच ना?" असे प्रश्न विचारल्यावर 'बाईच्या जातीनं एवढं बोलायचं नसतं,' असं सांगितलं जायचं पण, माझे प्रश्न कधी संपायचे-थांबायचे नाहीत.

मी सातवीत असतानाची गोष्ट. 'आपल्याला प्रश्न का पडत नाहीत?' या विषयावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं व्याख्यान आमच्या शाळेत झालं होतं. व्याख्यान नक्कीच विचारप्रवृत्त करणारं होतं; पण मला वाटायचं, 'नुसतेच प्रश्न पडूनही काय होणार ना?' कारण, मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरंच तेव्हा मिळत नसायची. कदाचित, शतकानुशतकांपासून चालत आलेल्या सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना घट्ट असण्याच्या काळात, विटाळाबद्दल 'ब्र'ही काढायचा कुणी विचार करत नसतानाच्या वातावरणात देहाच्या मासिक पाळीवर निर्भीडपणे अभंग रचणाऱ्या व 'देहात विटाळ असतो; मग देह कुणी निर्माण केला?' असा प्रश्न अभंगातून विचारणाऱ्या संत सोयराबाई माझ्या सभोवतालच्या महिलांपर्यंत पोहोचल्याच नाहीत. घरात व्यक्त व्हायला मिळत नाही म्हणून मी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे विषय मुद्दाम स्त्री स्वातंत्र्याशी निगडित निवडत असे आणि जिंकतही असे. 

ग्रामीण भागात आजही अशा विषयांवर मोकळेपणानं बोलण्याचा प्रयत्न केला तर बायका 'निर्लज्ज कुठली' असा टॅग लावतात. बाई ही समाजाची जननी असते... पुरुषाइतकाच तिलाही जगण्याचा अधिकार असतो... तिच्या जननेंद्रियातून पाच दिवस होणारा रक्तस्राव अपवित्र नाही... ती केवळ 'ती' आहे म्हणून कुणाची गुलाम किंवा बांधील नाही, हे बाईलाच कळत नाही याला काय म्हणा‍वं? याच 'ती'नं आपापल्या क्षेत्रात बुद्धीची, प्रज्ञेची, कर्तृत्वाची किती मोठी झेप घेतली होती याचे पुराणकाळातले-इतिहासातले किती तरी दाखले नावानिशी देता येतील. मात्र, असं असलं तरी मासिक पाळीच्या मानसिक गुलामगिरीतून 'ती' - आजच्या अत्याधुनिक काळातली 'ती' - पूर्णपणे मुक्त कधी होणार? हा प्रश्न उरतोच. 

एक बाई मला म्हणाली होती, 'ग्रामीण भागात एका समाजात आजही स्त्रियांना प्रसूतीनंतर किंवा पाळीदरम्यान घराच्या बाहेर ठेवलं जातं, त्यापेक्षा आपलं तर बरंच आहे ना!' म्हणजे, ते लोकं या गोष्टी स्वीकारत नाहीत म्हणून, आपण जेवढं स्वीकारतोय तेवढंही खूप झालं, असं समजून, बदलासाठीचं पुढचं पाऊल टाकणंच आपण बंद करत असतो! आणखी एक निरीक्षणातली बाब म्हणजे, पाळी आलेल्या बाईचा स्पर्शही चालत नाही, असेही काही महाभाग आजच्या काळातसुद्धा आढळतात. ही तर दांभिकतेची हद्दच झाली म्हणायची.

काय नि, कसली इच्छा!
सातपुड्याच्या सत्रासेन भागातील आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी एका वृत्तपत्रात काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. आदिवासी पाड्यावरच्या त्या बाईनं पाळीदरम्यान कापड म्हणून जुना ब्लाऊज वापरला होता. त्या ब्लाऊजला हूक होते. त्या हुकांवर गंज चढला होता. ब्लाऊजचं ते कापड हुकांसह वापरलं गेल्यामुळे धनुर्वात होऊन त्यातच तिचा मृत्यू झाला. हे का झालं? कारण, ती तिच्या मासिक पाळीसंदर्भातल्या आरोग्याबद्दल अनभिज्ञ होती. आसामच्या काही भागांत आजही, मुलींना पाळी यायला सुरुवात झाली की त्यांना शाळेत पाठवणं बंद केलं जातं. शिक्षण बंद झालं म्हणजे तिचा मानसिक, सामाजिक विकास खुंटतो. काही वर्षांनंतर समजा कुणी त्या मुलीला एखाद्या निर्णयाबद्दल विचारलं की, 'तुझी काय इच्छा आहे? तुला काय वाटतंय?' तर अशा वेळी ती भांबावून जाईल. तिला उत्तर तर सुचणार नाहीच; पण 'माझी  काय नि कसली इच्छा असणार,' असाच उलट प्रश्न तिला पडेल! कारण, 'वैचारिक स्वातंत्र्य' म्हणजे काय हेच तिला ठाऊक नसतं, मग ते कळणं, त्याचे लाभ कळणं दूरच राहिलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, आता स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर तरी 'ती'नं 'स्वतःच्या स्वातंत्र्या'साठी बंड करणं गरजेचं वाटतं. 'बाईच्या जातीनं एवढं बोलायचं नसतं,' असं सांगून 'ती'चा आवाज अजून किती दिवस बंद केला जाणार? पुरुषसत्ताक मानसिकतेनं तयार केलेल्या तथाकथित चौकटीत 'ती'ला किती दिवस अडकवून ठेवलं जाणार? परंपरेच्या नावाखाली 'ती'च्यावर दडपण न टाकता 'ती'ला 'ती'च्या मनाप्रमाणे, 'ती'च्या इच्छेनं जगू द्या. 'ती'च्यावर बंधनं लादून 'ती'चं स्वातंत्र्य हिरावून घेण्यापेक्षा 'ती'चे छोटे-मोठे निर्णय 'ती'लाच घेऊ द्या. प्रश्न मासिक पाळीच्या नावाखाली दडपल्या जाणाऱ्या 'ती'च्या भावनांचा, 'ती'च्या स्वातंत्र्याचा, 'ती'च्या मनमुक्त जगण्याचा आहे... काळजीच्या नावाखाली पाच दिवस 'वाळीत टाकल्या'ची वागणूक देण्याचा आहे... बदलत्या काळानुसार आता आधुनिक उपाययोजना, आधुनिक साधनसुविधा उपलब्ध आहेत. तेव्हा, 'त्या' दिवसांत 'ती'नं कोपऱ्यात बसून राहावं अशी परिस्थिती आता नाही.

विश्रांतीची गरज ओळखावी 
'पाळीदरम्यान क्रिकेट खेळायला मी येत नाही, माझं पोट दुखतंय,' असं मी भावाला सांगितलं तर स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या पुराणातल्या-इतिहासातल्या बुद्धिमान स्त्रियांची, वीरांगनांची, रणरागिणींची उदाहरणं देऊन तो मला म्हणतो, 'कुठं त्या बुद्धिमान, शूर-वीर स्त्रिया आणि कुठं पाळी आली म्हणून तेच चार दिवस धरून बसणारी तू! चल ऊठ, तुला आज पहिली बॅटिंग देतो.' त्याच्या या आश्वासक शब्दांमुळे, आधुनिक दृष्टिकोनामुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढतो आणि मीच माझ्या अवतीभवती लादून घेतलेल्या चौकटी तोडून बाहेर पडू लागते... हे बाहेर पडणं केवळ माझ्यासाठी नसतं, तर समस्त 'तीं'साठी असतं!

जेव्हा तिचं 'ती' असणं ती गृहीत धरू देत नाही तेव्हा या 'चौकटी' बिथरू लागतात! कारण, जेव्हा 'ती' समाजाला घाबरत नाही तेव्हा हा समाज 'ती'ला घाबरतो. 'ती'ला घाबरवण्याचे अनेकानेक सूक्ष्मातिसूक्ष्म मार्ग अवलंबतो. बारकाईनं विचार केला नाही तर 'ती'ला या मार्गांचा कधी पत्ताही लागणार नाही! काट्यासारखं रुतणारं असं काही ना काही 'ती'च्या प्रत्येक पावलागणिक असतंच असतं. वेगवेगळ्या रूपांत! हे जे रुतणं आहे, टोचणं आहे त्यावर वेळीच उपाय केल्यास त्या क्षणी थोडंफार दुखतंही. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यास ते कुरूपात रूपांतरित होऊन तिथंच घर करतं आणि मधूनमधून धगधगत, ठसठसत राहतं! हे 'कुरूप' म्हणजे 'ती'ची आपलीच माणसं असतात... कारण, ती 'आपली' असतात ना! 

शेवटी, यावरही मात करून, ते ठसठसणं-धगधगणं सहन करत 'ती' स्वतःला सिद्ध करत असतेच. कधी ढासळते, चुकते, पडते...परत उभी राहते; पण चालणं सोडत नाही. 'ती' कितीही, काहीही झालं तरी स्वल्पविराम घेते; पण प्रश्न उपस्थित करण्याला, त्यांची उत्तरं शोधण्याला आणि जगण्याला 'ती' कधी पूर्णविराम देत नाही. कोणत्याही स्थितीविषयी 'ती' जेव्हा रोखठोक प्रश्न उपस्थित करते तेव्हा समाजाकडून 'ती'च्यासंदर्भातही काही प्रश्न उपस्थित केले जातात... कारण, कुठल्याही व्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर 'चारित्र्य' नावाचं 'विनोदी लेबल' 'ती'च्यावर चिकटवलं जातंच! अर्थात्, हेही तसं काही नवीन नाही. पुरुषी मानसिकतेला धरूनच आहे!

तरीही 'ती' निरंतर चालत राहते. अनेक ध्येयं सोबत घेऊन... मात्र, त्यात एक मुख्य ध्येय जे अटळ असतं. ते असतं 'ती'च्या 'स्वातंत्र्या'चं. 'ती'ला 'माणूस' म्हणून जगता यावं यासाठीच्या 'ती'च्या धडपडीचं! त्यासाठी 'ती' प्रत्येक क्षणी लढत असते...आणि ही लढाई अशीच सुरू असते आयुष्यभर!

'ती'चं स्वतंत्र होणं नको असणारा एक गट समाजात सदैव असतो. 'ती'ला नेहमीच अंधश्रद्धेत, कर्मकांडात गुंतवून ठेवू इच्छित असतो हा गट. संस्कृतीच्या, परंपरेच्या नावाखाली 'ती'ला वेळोवेळी या गटाकडून समज दिली जाते : 'बाईच्या जातीनं जास्त बोलायचं नसतं!' 

सामाजिक काम करणारी माझी एक मैत्रीण चंचल ग्रामीण भागात सॅनिटरी पॅडचं वाटप करतानाचे तिचे अनुभव सांगताना म्हणते, पॅड वाटत असतांना आजही ग्रामीण भागात स्त्रिया प्रश्न करतात, 'हे काय ? बिस्किटचा पुडा आहे का?' एकूण काय तर, आजही मासिक पाळीबद्दल जनजागृती नाही, म्हणजेच 'ती'च्या आरोग्याबद्दल जागृती नाही. पाच दिवस वेगळं राहावं लागेल म्हणून खोट्या रूढी-परंपरांच्या नादात, डॉक्टरांचा सल्ला न घेता मासिक पाळी पुढं-मागं होण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. विशेषतः सणावारांच्या काळात तर हे हमखास घडताना दिसतं. असं केल्यामुळे आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होतात, याचा विचार कोण करतो!  

'ती'चा स्पर्श चालत नाही म्हणून पाच दिवस 'ती'ला 'वाळीत टाकण्या'पेक्षा, 'ती'ला मानसिक बंधनात ठेवण्यापेक्षा, त्या दिवसात 'ती'ला आरामाची गरज असते हे लक्षात घेऊन 'ती'ला जपलं - बाकीचे दिवस जशी 'ती' सर्वांना जपत असते. तसं केलं तर...? पण, अनेक ठिकाणी घडतं उलटंच. 'हे तर प्रत्येक महिन्याचं!' अशा तुच्छ, उपेक्षित, तटस्थ नजरेनं 'त्या' दिवसांकडे पाहिलं जातं. थोडाफार अपवाद वगळता, पाळीसंदर्भातली एकूण मानसिकता सडकी-किडकी आहे... 'मासिक पाळी ही मानसिक पाळी झाली आहे'. 'त्या' दिवसांत 'ती'ला जास्त काम करावं लागू नये, 'ती'ला शारीरिक आराम मिळावा हा खरा 'ती'ला बाजूला बसवण्यामागचा उद्देश पूर्वीच्या काळात असायचा. मात्र, त्याचंच रूपांतर खुबीनं 'विटाळा'त केलं गेलं. म्हणून, इथल्या चुकीच्या गोष्टींना न जुमानता आजच्या स्त्रियांनी स्वतःचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपत 'स्वतःच्या स्वातंत्र्या'साठी लढलंच पाहिजे. या समाजव्यवस्थेला प्रश्न विचारलेच पाहिजेत! तळागाळातील प्रत्येक स्त्री जेव्हा स्वतःच्या अधिकारांबद्दल, स्वतःच्या मानसिक स्वातंत्र्याबद्दल निर्भीडपणे बोलू लागेल, तेव्हाच 'ती'च्या या 'स्वातंत्र्य'लढ्याला यश आलं असं म्हणता येईल.