शस्त्रसंधीसाठीच्या एका आठवड्यानंतर इस्त्राईलने पुन्हा एकदा सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीतील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खान युनिस शहराला लक्ष्य करण्यात आले असून आजही या शहरावर विमानातून जोरदार बाँबवर्षाव करण्यात आला. खान युनिसला युद्धक्षेत्र जाहीर करणाऱ्या इस्त्राईलने नागरिकांना इतरत्र निघून जाण्याचा इशारा दिला आहे.
शस्त्रसंधीच्या मुदत तीन दिवसांपूवीं संपल्यापासून इस्राईलने पॅलेस्टाईनच्या खान युनिस शहर आणि परिसरावर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी विमानातून पत्रके टाकत नागरिकांना निघून जाण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर हजारो नागरिकांनी जीव वाचविण्यासाठी आणखी दक्षिणेकडे स्थलांतर सुरू केले आहे. मात्र, इस्त्राईलने खान युनिसबरोबरच दक्षिणेकडील राफा शहरानजीकही बाँववर्षाव केल्याने पॅलेस्टिनी नागरिकांची ससेहोलपट होत आहे. इस्राईलच्या सैनिकांनी गाझा शहराबरोबरच परिसरातील नागरिकांनाही निघून जाण्याचा इशारा देण्यास सुरुवात केली आहे. राफा शहराच्या किंवा नैऋत्येकडील किनारपट्टीच्या दिशेने जाण्यास नागरिकांना सांगितले जात आहे.