भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण मोहीम, ऑस्ट्रेलिया सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ऑस्ट्रेलियातील काही शहरांमध्ये भारतीयांविरोधात सुरू असलेल्या द्वेषपूर्ण मोहिमा आणि वर्णद्वेषी भित्तिचित्रांवरून (graffiti) ऑस्ट्रेलिया सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. "अशा प्रकारची वर्णद्वेषी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत," असे सरकारने स्पष्ट केले असले तरी, वाढत्या स्थलांतरविरोधी (anti-immigration) आंदोलनांमुळे भारतीय समुदायामध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑस्ट्रेलियातील काही गटांकडून वाढत्या स्थलांतराला विरोध केला जात असून, त्यांचे लक्ष्य प्रामुख्याने भारतीय नागरिक, विशेषतः शीख समुदाय ठरत आहे. अनेक ठिकाणी भारतीयांविरोधात द्वेषपूर्ण संदेश लिहिलेली भित्तिचित्रे आढळून आली आहेत, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारची भूमिका
या घटनांची गंभीर दखल घेत, ऑस्ट्रेलियाच्या सरकारने म्हटले आहे की, "आमचा देश एक बहुसांस्कृतिक समाज आहे आणि येथे कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषाला स्थान नाही. आम्ही भारतीय समुदायाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत." सरकारने या मोहिमांचा निषेध केला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

वाढत्या आंदोलनांमागे कारण काय?
ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही वर्षांत स्थलांतरितांची संख्या वाढली आहे, ज्यामुळे घरांच्या किमती आणि भाड्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच मुद्द्यावरून काही स्थानिक गट स्थलांतरितांविरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनांना आता वर्णद्वेषी स्वरूप प्राप्त होत असल्याने, परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

या घटनांमुळे केवळ भारतीयच नव्हे, तर इतर देशांतील स्थलांतरितांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या आश्वासनानंतरही, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी केली जात आहे.