१५ लाखांत एक दुर्मिळ घटना; ३४ वर्षीय महिलेने एकाच वेळी दिला चार निरोगी मुलींना जन्म

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 13 h ago
ऑस्ट्रेलियात महिलेने नैसर्गिकरीत्या दिला एकाच गर्भाशयातून जन्माला आलेल्या चार जुळ्या मुलींना जन्म
ऑस्ट्रेलियात महिलेने नैसर्गिकरीत्या दिला एकाच गर्भाशयातून जन्माला आलेल्या चार जुळ्या मुलींना जन्म

 

ऑस्ट्रेलियात एका महिलेने चार एकसारख्या जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिकरीत्या अशा प्रकारची गर्भधारणा होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

३४ वर्षीय जेनितार साऊ नावमोआना (Jenitar Sau Na'amoana) असे या महिलेचे नाव असून त्यांना आधीच चार मुले आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात क्वीन्सलँड राज्यातील 'रॉयल ब्रिसबेन अँड वूमन्स हॉस्पिटल'मध्ये या चार चिमुकल्यांना जन्म दिला. रुग्णालयाच्या मातृ-भ्रूण औषध तज्ज्ञ डॉ. अलेक्सा बेंडॉल यांनी सांगितले की, हे आश्चर्यकारक कुटुंब आता अधिक मोठे झाले असून त्यांची काळजी घेताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.

१५ लाखांतून एका महिलांसोबत घडणारी घटना
डॉ. बेंडॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारही मुलींची गर्भधारणा नैसर्गिकरीत्या झाली होती. एकाच फलित अंड्याचे (Fertilised Egg) चार भाग झाल्यामुळे हा दुर्मिळ योग घडून आला. नैसर्गिकरीत्या अशा प्रकारे एकाच अंड्यातून चार मुले जन्माला येण्याची शक्यता १५ लाखांमध्ये एका केसमध्ये असते. ऑस्ट्रेलियात अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सामान्यतः वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिकरीत्या चार जुळ्या मुलांना जन्म देण्याची शक्यता ७ लाखांत एक असते आणि बहुतांश घटनांमध्ये वैद्यकीय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते.

वैद्यकीय पथकाचे विशेष लक्ष
जेनितार आणि त्यांचे पती जोर्थम यांनी आणखी मुले जन्माला घालण्याचा कोणताही प्लॅन केला नव्हता. त्यामुळे जेव्हा चार जुळ्या बाळांची गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. चारही भ्रूण एकाच प्लॅसेंटाचा (वार) वापर करत असल्याने गर्भावस्थेत धोक्याची शक्यता अधिक होती.

जॉन हॉपकिन्स मेडिसिननुसार, एकापेक्षा जास्त बाळे गर्भात असताना मुदतपूर्व जन्म, गर्भपात किंवा इतर गुंतागुंत होण्याचा धोका असतो. त्यामुळे १० व्या आठवड्यापासूनच डॉक्टरांचे पथक त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून होते. २५ व्या आठवड्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि १४ जुलै रोजी २८ आठवडे ४ दिवसांच्या गर्भावस्थेनंतर सिझेरियनद्वारे प्रसूती करण्यात आली.

डॉक्टरांच्या सन्मानार्थ बाळाचे नाव
प्रसूतीदरम्यान जेनितार यांचा काही प्रमाणात रक्तस्राव झाला, मात्र त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. चारही बाळे सध्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या मुलींची नावे एमिली, हॅरियट, कॅथरीन आणि अलेक्सा अशी ठेवली आहेत. यातील 'अलेक्सा' हे नाव उपचार करणाऱ्या डॉ. अलेक्सा बेंडॉल यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे.