राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेतील (NEET) पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारने अत्यंत कठोर पावले उचलली असून, तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. या समस्येचा सामना करण्यासाठी सर्व राज्य सरकारांनी पक्षातीत राजकारण बाजूला ठेवून केंद्रासोबत एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एनडीएच्या संसदीय पक्षाच्या 'मंगल मिलन' या बैठकीत पंतप्रधान बोलत होते.
१३ आरोपींना अटक, पुनर्परीक्षेला प्राधान्य
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यांची माहिती दिली. पेपरफुटीचे वृत्त समोर आल्यानंतर सरकारने तत्काळ कारवाई करत १३ जणांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नीटच्या पुनर्परीक्षेला प्राधान्य देण्यात आले आणि तिचे निकालही वेळेत जाहीर करण्यात आले, असे बैठकीत सांगण्यात आले.
या प्रकरणातील दोषींना देशातील सर्वोच्च कायदेतज्ज्ञांच्या मदतीने कठोर शिक्षा मिळावी, जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही आणि एक नवीन आदर्श निर्माण होईल, असा भर पंतप्रधानांनी दिला.
मुक्त व्यापार करारात शेतकऱ्यांचे हित जपणार
या बैठकीत पंतप्रधानांनी विविध देशांसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचाही (FTA) उल्लेख केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार करार करताना भारतीय शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च स्थानी ठेवण्यात आले आहे आणि त्यांना कोणताही फटका बसणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेण्यात आल्याचे पंतप्रधानांनी एनडीए खासदारांना आश्वस्त केले.
बैठकीच्या सुरुवातीला नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेल्या नवीन खासदारांचे अभिनंदन करण्यात आले. चालू अधिवेशनात सर्व महत्त्वाची विधेयके संमत करण्यासाठी एनडीए सकारात्मक भूमिका बजावेल आणि विरोधी पक्षांनीही देशाच्या व तरुणांच्या हितासाठी सहकार्य करावे, असे आवाहन रिजिजू यांनी केले.