खलिस्तान समर्थकांचा हल्ला असमर्थनीय असल्याचा ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 8 Months ago
संबंधितांवर कठोर कारवाई करू
संबंधितांवर कठोर कारवाई करू

 

 लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तालयावर खलिस्तान समर्थकांनी केलेल्या हल्ल्याची घटना असमर्थनीयच असून आम्ही येथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊ, अशी ग्वाही ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी आज दिली. तसेच, अशा प्रकारच्या घटनांना ब्रिटिश सरकार पूर्ण गांभीर्याने घेत असून पुन्हा असा प्रसंग उद्भवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

खलिस्तान समर्थकांनी १९ मार्च रोजी भारताच्या उच्चायुक्तालयामध्ये घुसत घोषणाबाजी केली होती, तसेच तिरंगा ध्वजही खाली खेचला होता. या प्रकरणानंतर भारताने संताप व्यक्त केला होता. खलिस्तानवाद्यांना रोखण्यासाठी उच्चायुक्तालयाबाहेर ब्रिटनचा एकही सुरक्षा सैनिक तैनात नव्हता, याबद्दल भारताने नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविला होता. आजही सुमारे दोन हजार खलिस्तान समर्थकांनी भारताच्या उच्चायुक्तालयासमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली. या निदर्शकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. उच्चायुक्तालयाबाहेर मात्र पोलिसांचा कडक पहारा होता. यानंतर ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री क्लेव्हर्ली यांनी एक निवेदन प्रसिद्ध करत अशा प्रकारच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली. आवश्‍यकता भासल्यास भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सुरक्षा पुरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लेव्हर्ली यांनी म्हटले आहे की, "आम्ही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कायमच दक्ष असतो. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास आम्ही कठोर कारवाई करू. भारत आणि ब्रिटनमधील संबंध अत्यंत जवळचे असून दोन देशांमधील जनतेमध्येही चांगला संपर्क आहे. भविष्यातही आम्ही एकत्रित काम करत समान उद्दीष्ट्ये पूर्ण करू."

 

पुन्हा एकदा निदर्शने

खलिस्तानवाद्यांनी आज काढलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर ब्रिटन सरकारने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. रविवारी घुसखोरी करणाऱ्या गटातील काही लोकही आज घोषणाबाजी करत होते. या सर्वांना प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या पलिकडेच रोखण्यात आले होते. काही जणांनी उच्चायुक्तालयाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. यानंतर पोलिसांची आणखी कुमक आली. मात्र, या निदर्शनांना प्रत्युत्तर म्हणून भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनीही इमारतीच्या गच्चीवर जात मोठ्या आकाराचा तिरंगा फडकाविला. तसेच, दोन दिवसांपूर्वीच दर्शनी भागात भला मोठा तिरंगा लावण्यात आला आहे. पंजाबमध्ये ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेविरोधात सुरु असलेल्या कारवाईवरून ब्रिटनमध्ये सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहेत. उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांनी ब्रिटनमधील पंजाबी नागरिकांना आवाहन करत, अफवांवर विश्‍वास न ठेवण्याची विनंती केली.