गाझा पट्टीतील युद्ध आता तातडीने थांबविण्याची गरज आहे, असे आवाहन ब्रिटन, जपान आणि कॅनडासह २८ देशांनी केले आहे. यामुळे इस्त्राईलवरील दबाव वाढला असून गाझामधील संघर्षाच्या मुद्द्यावर हा देश एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या भूमिकेचे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने स्वागत केले आहे, तर इस्त्राईल आणि अमेरिकेने आरोप नाकारले आहेत.
ऑस्ट्रेलियासह २८ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत गाझा पट्टीतील नागरिकांच्या बिकट परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. 'गाझामधील नागरिकांचे हाल प्रचंड वाढले आहेत. मदतसाहित्याच्या पुरवठ्यात अडथळा आणणे, सामान्य नागरिकांवर गोळीबार करणे हे अमानवी आहे. त्यांना अन्न-पाण्यापासूनही वंचित ठेवले जात आहे,' असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. मागील काही आठवड्यांत मदत मिळविण्यासाठी जात असलेल्या ८०० नागरिकांची
इस्त्राईलच्या सैनिकांनी गोळ्या घालून हत्या केल्याबाबत मानवाधिकार संघटनेने दिलेल्या अहवालाची दखल निवेदनात घेण्यात आली आहे. मदत साहित्याचे वाटप करण्याची इस्राईलची यंत्रणा धोकादायक असून पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांच्या मानवाधिकारांपासून वंचित ठेवणारी आहे, अशी टीका निवेदनात करण्यात आली आहे. इस्राईलने आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत सामान्य नागरिकांना योग्य मदत करावी, असा दबावही निवेदनाद्वारे टाकण्यात आला आहे.
इस्राईलला आरोप अमान्य
इमाईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे संयुक्त निवेदन नाकारले आहे. या निवेदनात वास्तवाचा विपर्यास करण्यात आला असून यामुळे हमामला बळ मिळणार आहे, अशी टीकाही इसाईलने केली आहे. तात्पुरती शस्त्रसंधी करून अपहृतांची सुटका करण्याचा प्रस्ताव नाकारणारी हमास ही संघटनाच युद्धाला कारणीभूत असल्याचा दावाही इस्राईलने केला आहे. अमेरिकेचे इस्राईलमधील राजदूत माइक हुकाबी यांनीही निवेदन नाकारले आहे. आमच्या मित्रदेशांनी हमासवर अधिक दबाव आणावा, असा सल्लाही त्यांनी युरोपीय देशांना दिला आहे. या निवेदनात जर्मनीचाही सहभाग नव्हता.
नागरिकांची स्थिती बिकट
पावणे दोन वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षांमुळे गाझा पट्टीतील स्थिती बिकट झाली आहे. या प्रदेशातील वीस लाख नागरिकांपैकी ९० टक्के जण विस्थापित असून बहुतांश जणांना अनेकवेळेस विस्थापन करावे लागले आहे. येथील सर्व व्यवसाय, उद्योग बुडाल्याने हे सर्व जण मदत म्हणून येणाऱ्या अन्न-पाण्यावरच अवलंबून आहेत. या मदत वाटप यंत्रणेवरही इस्राईलला नियंत्रण ठेवायचे असल्याने त्यात अनेकवेळा अडथळे निर्माण होत आहेत. या स्थितीमुळे गाझा पट्टीत उपासमारीचा धोका तीव्र झाला आहे. इस्राईलच्या या धोरणामुळे या देशावर जगभरातून टीका होत असून जागतिक व्यासपीठांवर ते दिवसेंदिवस एकाकी पड़त आहेत.