जागतिक तापमानवाढीने सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा सारख्या नद्यांचे पाणी कमी होण्याची शक्यता - यूएन सरचिटणीस

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस

 

न्यूयॉर्क: जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्यांचे आणि बर्फाच्या थरांचे आकारमान घटण्याची शक्यता असल्याने सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यासारख्या भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या नद्यांमधील पाणीही कमी होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी दिला. आंतरराष्ट्रीय हिमनद्या जतन वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

गुटेरेस म्हणाले,‘‘ पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी हिमनद्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या हिमनद्याचे पाण्याच्या मुख्य स्रोत असतात. आज जगातील जमिनीच्या एकूण क्षेत्रफळापैकी १० टक्के भाग हिमनद्यांनी व्यापलेला आहे. मात्र, मानवाच्या विविध कृतींमळे जागतिक तापमानात वाढ होत असून त्यामुळे हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. आशियातील दहा महत्त्वाच्या नद्यांचा उगम हिमालयात आहे. या नद्या १.३ अब्ज लोकांना पाणी पुरवठा करतात. येत्या काही दशकांमध्ये हिमनद्यांचे आकारमान कमी होणार असल्याने गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू यांसारख्या नद्यांमधील पाणीही कमी होणार आहे. त्याचा मानवी जीवनावर निश्‍चितच परिणाम होईल.’’ हिमालयातील बर्फ वितळल्यानेच नद्यांना पूर येऊन पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी काय अवस्था झाली, ते जगाने पाहिलेच आहे, असेही गुटेरेस यांनी निदर्शनास आणून दिले.
 
गुटेरेस म्हणाले..
- दरवर्षी अंटार्क्टिका खंडावरील १५० अब्ज टन बर्फ वितळतो
- ग्रीनलँडवरील २७० अब्ज टन बर्फ दरवर्षी वितळतो
- जागतिक सरासरी समुद्र पातळीत वेगाने वाढ
- सर्व जगाने एकजूट होत तापमानवाढीचा सामना करावा
- उत्सर्जन तातडीने कमी करणे गरजेचे
- पर्यावरणासाठी मोठा निधी आवश्‍यक
 
यूएनचे सरचिटणीस, अँटोनिओ गुटेरेस तापमानवाढीमुळे समुद्रपातळी वेगाने वाढत असून आपण याकडे दुर्लक्ष केले तर परिणाम भयंकर होतील. समुद्र किनाऱ्यावर असलेले अनेक भाग, काही देशही पाण्याखाली जातील. प्रचंड मोठ्या प्रमाणावरील स्थलांतराचा सामना करावा लागेल. पाणी आणि जमिनीसाठी प्रत्येकाला झगडावे लागेल. हे टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्‍यक आहेत.