दोन महिन्याच्या युद्धविराम प्रस्तावाला इस्राईलची मंजुरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने जाहीर केलं आहे, की इस्राईलने गाझामधील 60 दिवसांच्या युद्धविराम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला सादर केला आहे. यामुळे गाझातील युद्ध थांबवून ओलिसांची सुटका आणि मानवतावादी मदत पोहोचवण्याच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत. मात्र, इस्राईली सैन्याने युद्धग्रस्त भागात आपली लष्करी कारवाई सुरूच ठेवली आहे.

व्हाईट हाऊसचा दावा
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, “इस्राईलने या युद्धविराम प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. विशेष दूत स्टीव्ह व्हिटकॉफ आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा प्रस्ताव हमासला पाठवला आहे. इस्राईलने याला पाठिंबा दिला आहे. सध्या चर्चा सुरू असून, आम्हाला आशा आहे, की गाझामध्ये युद्धविराम लागू होईल आणि सर्व ओलिसांना घरी परत आणता येईल.”

प्रस्तावातील प्रमुख मुद्दे
  • इस्राईली अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावात खालील बाबींचा समावेश आहे:
  • 60 दिवसांचा युद्धविराम : युद्धग्रस्त गाझामध्ये दोन महिन्यांसाठी लष्करी कारवाया थांबवल्या जाणार.
  • ओलिसांची सुटका : 10 जिवंत ओलिस आणि 18 मृत ओलिसांचे मृतदेह सोडवले जाणार.
  • मानवतावादी मदत : संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून गाझामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न, औषधं आणि इतर मदत पोहोचवली जाणार.
  • इस्राईली सैन्याची माघार : इस्राईली सैन्य मार्च २०२५ मधील युद्धविरामापूर्वीच्या स्थानांवर माघार घेईल.

हमासची प्रतिक्रिया
हमासने गुरुवारी एका संक्षिप्त निवेदनात सांगितलं की, “त्यांच्या नेतृत्वाला स्टीव्ह व्हिटकॉफ यांचा हा नवीन प्रस्ताव मध्यस्थांमार्फत प्राप्त झाला आहे. हमासचा नेतृत्वगट हा प्रस्ताव जबाबदारीने अभ्यासत आहे. आमच्या लोकांचे हित, त्यांना दिलासा आणि गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धविराम साध्य करणं, हे आमचं उद्दिष्ट आहे,” असं हमासने म्हटलं आहे.

हा युद्धविराम प्रस्ताव यशस्वी झाल्यास गाझामधील मानवतावादी संकट कमी होऊ शकतं. मात्र, इस्राईल  आणि हमासमधील काही मूळ मतभेद अजूनही कायम आहेत. इस्राईलला हमासला पूर्णपणे नष्ट करायचं आहे आणि युद्ध पुन्हा सुरू करण्याचा पर्याय खुला ठेवायचा आहे. दुसरीकडे, हमासला युद्धविरामानंतर युद्ध कायमस्वरूपी थांबण्याची आणि इस्राईलच्या सैन्याची पूर्ण माघार होण्याची हमी हवी आहे.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या गटाकडून युद्ध सुरू ठेवण्याचा दबाव आहे. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषत: जर्मनी, इटली, ब्रिटन, कॅनडा आणि फ्रान्स यांनी गाझातील नागरी मृत्यू आणि लष्करी कारवाईवर टीका केली आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter