गाझा पट्टीमध्ये उपासमारी आणि अन्नटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे, असे आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्नसंकटाबाबत काम करणाऱ्या इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी (आयपीसी) संस्थेने म्हटले आहे. तातडीने पावले उचलली नाहीत, तर व्यापक मृत्यू होण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. या इशाऱ्याला अजून अधिकृत उपासमार घोषणेप्रमाणे दर्जा देण्यात आलेला नाही. मात्र, स्थिती गंभीर असल्याचे चित्र आहे. गाझामधील कुपोषित मुलांचे फोटो आणि जवळपास २२ महिन्यांच्या युद्धानंतर उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूंच्या अहवालांमुळे जगभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय दबावामुळे इस्त्राईलने गेल्या दिवसांत उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये हवाई मार्गाने अन्नपदार्थ वाटप आणि इतर काही बाबींचा समावेश आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रे आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या म्हणण्यानुसार तेथे प्रत्यक्षात फारसा बदल झालेला नाही. अन्नासाठी हवालदिल झालेला जमाव मदतीचे ट्रक पोहोचण्याआधीच त्यांच्यावर तुटून पडतो आणि सामान उतरवून स्वतःच्या ताब्यात घेतो.
इंटिग्रेटेड फूड सिक्युरिटी फेज क्लासिफिकेशन (आयपीसी) या संस्थेने म्हटल्यानुसार, गाझा गेली दोन वर्षे उपासमारीच्या उंबरठ्यावरच आहे. मात्र, अलीकडील घडामोडींनी परिस्थिती बिकट आहे. इस्त्राईलकडून गाझा सीमेवर वाढविलेली नाकाबंदीही त्यामध्ये समाविष्ट आहे.
अधिकृतपणे उपासमार जाहीर करणे ही एक दुर्मीळ प्रक्रिया आहे. गाझामध्ये प्रवेश आणि आतल्या हालचालींवरील निर्बंधांमुळे खरी माहिती मिळवणे कठीण झाले आहे. 'आयपीसी'ने आतापर्यंत २०११ मध्ये सोमालियात, २०१७ आणि २०२० मध्ये दक्षिण सुदानमध्ये आणि गेल्या वर्षी सुदानच्या पश्चिम डारफूर भागात अधिकृतपणे उपासमार जाहीर केली होती. मात्र, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये जे घडत आहे, त्यासाठी अधिकृत घोषणांची गरज नाही. ज्याप्रमाणे प्रयोगशाळेतील चाचण्यांची वाट न पाहता एखादा डॉक्टर रुग्णाच्या लक्षणांवरून निदान करू शकतो, त्याचप्रमाणे आपण गाझाच्या स्थितीचे विश्लेषण करू शकतो, असे 'मास स्टार्वेशन द हिस्ट्री ऑफ फ्युचर ऑफ फेमिनाइन'चे लेखक आणि 'वर्ल्ड पीस फाउंडेशन'चे कार्यकारी संचालक अॅलेक्स डी वॉल यांनी सांगितले.
काय आहे स्थिती ?
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार, कोणत्याही भागाला उपासमार असलेला प्रदेश म्हणून वर्गीकृत करण्यासाठी पुढील अटी पूर्ण असणे आवश्यक
आहे. किमान २० टक्के घरांमध्ये अन्नाचा गंभीर अभाव आहे, म्हणजे ती कुटुंबे जवळपास उपाशीच आहेत.
सहा महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतची किमान ३० टक्के मुले तीव्र कुपोषित आहेत; तसेच त्यांच्या उंचीच्या तुलनेत त्यांचे वजन अत्यल्प आहे. दर १०,००० लोकसंख्येमागे रोज किमान दोन प्रौढ किंवा चार पाच वर्षांखालील मुले उपासमारीमुळे, कुपोषण आणि आजार यांच्या एकत्रित परिणामांमुळे मृत्युमुखी पडत आहेत.
गाझातील सद्यःस्थितीची माहिती २५ जुलैपर्यंत उपलब्ध असलेल्या अहवालावर आधारित आहे आणि या संकटाने आता एक अतिशय धोकादायक आणि प्राणघातक वळण घेतल्याचे नमूद केले आहे. अहवालानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून गाझामधील अन्नाची उपलब्धता सर्वांत खालच्या स्तरावर गेली आहे. गाझा पट्टीत पाच वर्षांखालील दर १०० मुलांपैकी जवळजवळ १७ मुले तीव्र कुपोषित आहेत.