भारताच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची पाकिस्तानमध्ये हत्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Years ago
हंझला अदनान गोळ्या झाडून हत्या केलेला फोटो
हंझला अदनान गोळ्या झाडून हत्या केलेला फोटो

 

भारताच्या आणखी एका मोस्ट वाँटेड दहशतवाद्याची हत्या झाली आहे. लष्कर-ए-तयब्बाचा दहशतवादी हंझला अदनान याचा अज्ञातांनी पाकिस्तानच्या कराचीमध्ये खात्मा केला आहे. विशेष म्हणजे अदनान हा २०१५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथील बीएसफच्या तळावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. 

२६/११ चा मास्टरमाईंड हाफिस सईद याचा अदनान हा जवळचा सहकारी असल्याचं बोललं जातं. ३ डिसेंबरच्या रात्री त्याला त्याच्या घराच्या बाहेर गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याला चार गोळ्या घालण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला आहे.

अदनान याने आपला ऑपरेशन बेस रावळपिंडीतून कराची येथे हलवला होता. अदनान हा २०१५ मध्ये बीएसफच्या तळावर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात २ बीएसएफ जवान शहीद झाले होते, तर १३ जवान जखमी झाले होते. एनआएएने याप्रकरणी चार्जशीट दाखल केली होती.

जम्मू-काश्मीरमधील पांपोरे येथे २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यातही अदनानचा हात होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ८ जवान शहीद झाले होते, तर २२ जण जखमी झाले होते. चार दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याचा मृत्यू झाला होता. रोडे हा जर्नलसिंग बिंद्रावालेचा भाच्चा होता. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा होतोय खात्मा
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. याआधी मुफ्ती कैसर फारुक, खलिस्तानी दहशतवादी (terrorist) परमजीत सिंग पंजवड, एजाज अमहद अहंगर, बशीर अहमद पीर यांना अज्ञातांनी मारलं होतं. मोस्ट वाँटेट शाहिद लतीफचीही हत्या करण्यात आलीये. लतीफ हा २०१६ मध्ये पठाण कोट एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता.अज्ञात व्यक्तींनी या सर्वांना संपवलं आहे.