इराण-इस्त्राईल युद्धात अमेरिकेची उडी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 4 h ago
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

 

इराण-इस्त्राईल संघर्षात अमेरिकेने उडी घेत इराणमधील तीन अणुकेंद्रांवर बाँब टाकले. या हल्ल्यात या तिन्ही अणुकेंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. यावर इराणनेही प्रत्युत्तर देताना, 'आता चर्चा करण्याची वेळ संपली असून, आमचे संरक्षण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे,' असा इशारा दिला. त्यांनी इस्त्राईलवर क्षेपणास्त्रांचा मारा करत काही प्रमाणात नुकसानही घडवून आणले. या घडामोडींमध्ये प्रादेशिक युद्धाचा भडका उसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

इस्त्राईलच्या हल्ल्यांना खुला पाठिंबा देतानाच इराणवर अणुकरार करण्यासाठी अमेरिकेकडून दबाव आणला जात होता. या युद्धात थेट हस्तक्षेप करायचा की नाही, हे दोन आठवड्यांत ठरवू, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले होते. प्रत्यक्षात दोन दिवसही वाट न पाहता अमेरिकेने 'मिडनाइड हॅमर' ही मोहीम राबवीत आज इराणमधील नातांझ, फोर्दो आणि इस्फहान या केंद्रांवर बाँबफेक केली. जमिनीखाली असलेल्या फोर्दो अणुकेंद्रावर मारा करण्यासाठी अमेरिकेने 'बी-२' बाँबर विमानातून बंकर बस्टर या साडेतेरा हजार किलो वजनाच्या बाँबचा वापर केला. याशिवाय, अमेरिकेने पाणबुड्यांवरून ३० टॉमहॉक क्षेपणास्त्रांचाही मारा केला. या वेळी इराणकडून कोणताही प्रतिकार झाला नाही. इराणमधील सत्ता उलथवून टाकण्याचा हा प्रयत्न नव्हता, असेही अमेरिकेने स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनीच या हल्ल्याबाबतची माहिती सोशल मीडियावरून जाहीर करताना, 'हे युद्ध संपविण्यासाठी इराणने आता तयार व्हावे' असा इशाराही दिला. इराणने हल्ला झाल्याचे मान्य केले असले तरी माघार न घेता अणु कार्यक्रम थांबविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणवरील हल्ल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. अमेरिकेने लढाऊ विमानांद्वारे केलेल्या या हल्ल्यामुळे अणुकेंद्रांमधून किरणोत्सर्ग झाला नसल्याचे इराणच्या अणुऊर्जा संघटनेने सांगितले आहे. या हल्ल्यात डोंगराळ भागात जमिनीखाली असलेल्या फोर्दो अणुकेंद्राच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाल्याचे उपग्रहांनी घेतलेल्या छायाचित्रांतून दिसून आले आहे. शक्तिशाली बाँबस्फोटामुळे डोंगरही फुटल्याने अणुकेंद्रात जाण्याचा प्रवेशमार्गच बंद झाला आहे. त्यामुळे या केंद्राचे कामकाज सुरू ठेवण्यासाठी इराणला हा सर्व मलबा बाजूला काढावा लागणार आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर काही तासांतच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड या निमलष्करी दलाने इस्त्राईलवर ४० क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यात इस्त्राईलमधील ८० हून अधिक जण जखमी झाले. तेल अविवमधील काही इमारती आणि रस्त्यांचेही या हल्ल्यात नुकसान झाले. मात्र, ज्या यंत्रणेद्वारे इराणने आज क्षेपणास्त्रांचा मारा केला, ती यंत्रणाच नंतर हल्ला करत नष्ट केल्याचा दावा इस्त्राईलने केला. 

तणाव कमी करा : मोदी
इराणमधील फोड़ों तसेच अन्य दोन अणुकेंद्रांवर अमेरिकने हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दूरध्वनीवरून इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान यांच्याशी संवाद साधत तणाव कमी करण्याचे तसेच शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

इराण आणि इस्त्राईल यांच्यातील युद्धाने विक्राळ स्वरूप धारण केलेले असतानाच रविवारी मध्यरात्री अमेरिकेने इराणमधील फोर्डो, इस्फहान आणि नातांझ या तीन अणुकेंद्रांवर विध्वंसक हल्ले केले होते. मध्यपूर्वेतील तणाव यामुळे वाढला आहे. तणाव तत्काळ कमी करण्यासाठी संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन मोदी यांनी पेजेशकियान यांना केले आहे. "प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थिरता टिकून राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे मी इराणच्या पंतप्रधानांना सांगितले," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमातून याबाबत दिलेल्या माहितीत नमूद केले.

प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे पेजेशकियान यांनी मोदी यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मोदी आणि पेजेशकियान यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली.

इराणशी चर्चेस तयार
अचानक हल्ले करून इराणला हादरा दिल्यानंतर अमेरिकेने इराणबरोबर नव्याने चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दीर्घकालीन युद्ध टाळण्यासाठीच हा प्रयत्न असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे. इराणकडे प्रतिहल्ला करण्याची क्षमता नसल्याने ते चर्चेसाठी तयार होतील, असा विश्वास अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. संरक्षणमंत्री पीट हेजसेथ यांनी आज पत्रकार परिषद घेत अमेरिकेला युद्ध लांबविण्यात रस नसल्याचे सांगितले. तसेच, देशाचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही इराणने आता चर्चेसाठी तयार व्हावे, असे सुचविले आहे.

होर्मुझची नाकाबंदी शक्य
अणुकेंद्रांवरच हल्ला केल्याने इराणने अखेर हुकुमी अस्त्र बाहेर काढले आहे. जगातील ३० टक्के कच्च्या तेलाची आणि एक तृतियांश नैसर्गिक वायूची वाहतूक होणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यास इराणच्या संसदेने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा समितीने अद्याप 'हिरवा कंदील' दिलेला नाही. मात्र, तसा निर्णय झाल्यास जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती भडकू शकतात. या सामुद्रधुनीवर इराणचे वर्चस्व आहे.

ठळक घडामोडी

नागरी वाहतुकीसाठी इस्त्राईल हवाई हद्द बंद
जगभरातील नेत्यांकडून शांततेचे आवाहन
इराण-इस्त्राईलदरम्यान हल्ले सुरूच

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी संसदेची परवानगी न घेताच इराणममध्ये हल्ले करण्याचा आदेश दिला होता. तसेच, गरज पडल्यास आणखी हल्ले करू असेही त्यांनी सांगितले. 'इराणने आता तरी शांतता कराराला तयार व्हावे. आता एक तर शांतता निर्माण होईल किंवा इराण उद्ध्वस्त होईल,' असा इशारा त्यांनी सोशल मीडियावरून दिला. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter