मुस्लीम कुटुंबाच्या 'या' अनोख्या वारीसेवेचे होतंय सर्वत्र कौतुक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
हुंडेकरी परिवाराच्या वतीने नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले
हुंडेकरी परिवाराच्या वतीने नाशिकहून निघालेल्या वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले

 

आषाढी एकादशीनिमित्त नाशिक ते पंढरपूर अशी गेल्या तेरा वर्षांपासून सायकलवारी निघते. दरवर्षी करीमशेठ हुंडेकरी यांच्या वतीने हुंडेकरी लॉनमध्ये त्यांच्या भोजन, निवास व अल्पोपहाराची व्यवस्था केली जाते. या वारीत तब्बल तीनशे ते चारशे सायकलिस्ट असतात. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हुंडेकरी यांच्या या सामाजिक सेवेचे कौतुक केले.

उद्योजक हाजी करीमभाई हुंडेकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "पंढरपूरला जाणारा वारकरी माझ्या दारात येतो, हे मी माझे भाग्य समजतो. या सेवेत मोठे पुण्य आहे. जाती-धर्मात भेद करण्यापेक्षा माणुसकी धर्म जपण्याची गरज आहे."

या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे दिनेश आहेर, सायकलिस्ट दिंडीचे अध्यक्ष काळे, पोलीस अधिकारी संजय बारकुंड आदी उपस्थित होते. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने हुंडेकरी यांचा सत्कार करण्यात आला.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हटले की, "मी टेनिस खेळाडू असल्याने आरोग्याप्रती जागरुक आहे. रोज सायकलिंग व धावतो करत असतो. वारकरी तहान, भूक, कुटुंब विसरून पायी वारीत सहभागी होत असतो. आरोग्याचा संदेश देऊन दरवर्षी निघत असलेली या सायकल वारीचा उपक्रम प्रेरणादायी आहे."

या दिंडीत तीनशे ते चारशे महिला-पुरुष सायकलपटू दरवर्षी सहभागी होत आहे. पर्यावरण संवर्धन व आरोग्याचा जागर करीत निघालेल्या या सायकल दिंडीचा पहिला मुक्काम हुंडेकरी लॉनमध्ये असतो. दरवर्षी हुंडेकरी लॉन त्यांच्या स्वागतासाठी खुले ठेवले जाते. या सोहळ्यासाठी लग्नाची तारीखदेखील घेतली जात नाही, तर तो दिवस फक्त या वारकऱ्यांसाठी राखीव ठेवला जातो. यामध्ये सर्व सायकलपटू वारकरीच्या राहण्यापासून ते नाष्टा व जेवणाची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते.