प्रतिहल्ल्याचा आम्हाला अधिकार - इराण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई

 

"अशी कोणतीही लाल रेषा नाही, जी अमेरिकेने ओलांडलेली नाही. आज त्यांनी आमच्या अणुकेंद्रांवर हल्ले करत टोक गाठले आहे. आम्हालाही आमचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे," असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी आज दिला. इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ले करत अमेरिकेने इस्त्राईलच्या बाजूने युद्धात थेट सहभाग घेतला. या हल्ल्यानंतर अराघची यांनी इस्तंबूलमध्ये पत्रकार परिषद घेतली. अराघची म्हणाले, "अमेरिकेने आमच्यावर हल्ले करत संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचा आणि अण्वस्त्रप्रसार बंदी कराराचा भंग केला आहे. आमच्यावरील हल्ल्यांना इस्त्राईलबरोबर अमेरिकाही दोषी असल्याचे आमचे पूर्वीपासून म्हणणे होते. अमेरिकेने ओलांडली नाही, अशी एकही लाल रेषा नाही. आज तर त्यांनी आमच्या अणुकेंद्रांवर हल्ले करत सर्वांत मोठी लाल रेष ओलांडली आहे. ही लाल रेष सर्वांत धोकादायक होती. प्रतिहल्ला कसा व कधी करायचा, हे आम्ही अद्याप ठरविले नसले तरी आम्हालाही संरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा करण्याचे आवाहन केले असले तरी अराघची यांनी मात्र, चर्चेची वेळ आता संपून गेली आहे, असे म्हणत प्रत्युत्तर देण्याचे सूतोवाच केले. यानंतर होणाऱ्या धोकादायक परिणामांना केवळ अमेरिकाच जबाबदार असेल, असा इशाराही अराघची यांनी दिला.

अमेरिका आणि इस्त्राईलविरोधातील या संघर्षात इराणला कोणाची साथ आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अराघची यांनी रशियाकडून अपेक्षा व्यक्त केली. रशिया हा इराणचा जुना मित्रदेश असून आपण उद्याच (ता. २३) रशियाला रवाना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्याशी तातडीने संवाद साधण्याचे नियोजन नसल्याचे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सांगितले.

चीनकडून जोरदार टीका
इराण-इस्त्राईल युद्धात इराणची बाजू घेणाऱ्या चीनने अमेरिकेने आज केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. "अमेरिकेचे हल्ले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचा उघड उघड भंग आहे. हा प्रकार आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला कमी लेखण्याचा असून एक धोकादायक पायंडा पाडला जात आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळे प्रश्न सुटणार नसून चिघळणार आहे," असे चीनने म्हटले आहे. तसेच, फोर्दो अणुकेंद्र डोंगराळ भागात जमिनीखाली खोलवर असल्याने बंकर बस्टर बाँबनेही फार नुकसान झाले नसावे, असा अंदाज चीनने व्यक्त केला.

पाककडून निषेध व्यक्त
नोबेल शांतता पुरस्कारासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची कालच (ता. २१) शिफारस करणाऱ्या पाकिस्तानवर आज ट्रम्प यांच्याच आदेशाने झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्याची वेळ आली. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे प्रादेशिक युद्ध भडकण्याचा धोका असल्याचा इशारा पाकिस्तानने दिला आहे. 

 'अमेरिकाधार्जिणे धोरण सोडा'
"अमेरिकेचा इराणमधील अणुकेंद्रांवरचा हल्ला म्हणजे त्या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असल्याने केंद्रातील मोदी सरकारने अमेरिका तसेच इस्त्राईलधार्जिण्या धोरणाचा त्याग करावा," असे आवाहन डाव्या पक्षांनी संयुक्त निवेदनाद्वारे केले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक तणावात वाढ होईल. पश्चिम आशियात अस्थिरता वाढेल तसेच या घडामोडींचे आर्थिक जगतावर विपरीत परिणाम घडून येतील, असे डाव्या पक्षांनी निवेदनात म्हटले आहे.

"इराण अण्वस्त्रे तयार करण्याच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचा दावा करत अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर हल्ले केले आहेत. मात्र या हल्ल्यामुळे इराणच्या सार्वभौमत्वावर हल्ल झाला आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचे उल्लंघन झाले आहे. इराण अण्वस्त्रे तयार करत असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचे अमेरिकन गुप्तचरांनी सांगितले होते. तरीही इराणवर हल्ला करण्यात आला," असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माले), रिवोल्यूशनरी सोशालिस्ट पक्ष आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षांतील नेत्यांच्या स्वाक्षरी आहेत.

ओवेसींकडूनही निषेध
एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. "अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचेच नव्हे तर स्वतःच्या देशातील कायद्यांचेही या हल्ल्याद्वारे उल्लंघन केले आहे," असा आरोप ओवेसी यांनी केला आहे. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter