मोहरम उत्सव समितीच्या वतीने शनिवार पेठेतील खोल खंडोबा हॉलमध्ये आयोजित बैठकीला पीर पंजे धारकांची उपस्थिती
मोहरमला २७ जूनपासून सुरुवात होत असून, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पंजेप्रतिष्ठापना केली जाते. मोहरम उत्सव समितीच्या वतीने या पार्श्वभूमीवर आज बैठकीचे आयोजन केले होते. मोहरममधील महत्त्वाचा भाग असलेला पंजे भेटीचा सोहळा पारंपरिक वाद्यात करावा, असे आवाहन समितीने केले. बैठकीला उपस्थित सदस्यांनीही याला सहमती दर्शवत पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली.
शहरातील विविध तालीम संस्था, तरुण मंडळे, पंजे स्थापना करणाऱ्या कुटुंबीयांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवार पेठेतील खोलखंडोबा हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. सुरुवातीला राजी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ज्येष्ठांनी आपली मते मांडली.
पावसाळा असल्याने पीर-पंजे धारकांनीही सुरक्षित जागा निवडावी अशी सूचना मांडली. पंजे प्रतिष्ठापनेनंतर पाचव्या दिवसांपासून भेटीचे सोहळे सुरू होतात. यामध्ये पारंपरिक वाद्याचा वापर करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेणे, पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे अशा मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीला ओमकार शिंदे, महेश कदम, मासूम मकानदार, राजू महात, भैया मंडलिक, मंदार जाधव, प्रतीक मुळे, बंटी मुजावर, नाहिद वस्ताद, बाबूराव भोसले, इमरान बागवान, कुणाल मोरे यांच्यासह पीर पंजेधारक उपस्थित होते.