गाझात मदतपुरवठ्यास इस्त्राईल तयार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांना मदतसाहित्याचा पुरवठा करण्यासाठी युरोपीय महासंघाबरोबर करार करण्याचे इस्त्राईलने मान्य केले आहे. या करारामुळे गाझा पट्टीत अन्न व इंधनाचा पुरवठा करणे सोयीचे जाणार आहे. मात्र, करार करण्याचे मान्य होण्याच्या काही तासांतच इस्त्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण मदतकेंद्राच्या बाहेर उभे होते.

इस्त्राईलने गाझा पट्टीत मागील २१ महिन्यांमध्ये केलेल्या बाँबफेकीत येथील सर्व यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. सुमारे ९० टक्के लोक विस्थापित झाले असून दैनंदिन जनजीवन हा प्रकारच राहिलेला नाही. त्यामुळे येथील नागरिक जगण्यासाठी इजिप्तमार्गे येणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहेत. दररोज होणाऱ्या हल्ल्यामुळे येथे अन्नाचा व औषधांचा पुरवठा दर काही दिवसांआड होतो. 

त्यामुळे उपासमारीचे प्रमाण वाढले आहे. मागील चार महिन्यांत तर गाझा पट्टीत इंधनच आले नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यामुळे युरोपीय महासंघाने पुढाकार घेत इस्त्राईलशी बोलणी करत मदतसाहित्य आणि इंधनाचा पुरवठा वाढविण्याचा करार करण्याचे त्यांच्याकडून मान्य करवून घेतले. यानुसार, आज काही प्रमाणात इंधन गाझा पट्टीत दाखल झाले.

या करारामुळे गाझा पट्टीत मदतसाहित्याचे ट्रक येऊ शकतील, तसेच इमारतींची दुरुस्ती आणि मदत साहित्य पुरविणाऱ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याचीही हमी इस्त्राईलने दिली. मान्य केलेल्या प्रत्येक मुद्द्याची इस्त्राईलने अंमलबजावणी करावी, असे आवाहन युरोपीय महासंघाने केले. या करारानुसार, जॉर्डन आणि इजिप्तमधून गाझा पट्टीत येणारे मार्ग खुले केले जाणार आहेत. तसेच, गाझा पट्टीतील बेकऱ्याही उघडल्या जाणार आहेत. गाझा पट्टीत येणारे मदतसाहित्य हमासच्या हाती लागू नये, यासाठीही उपाययोजना केली जाणार आहे.

हल्ले मात्र सुरूच
कराराला मंजुरी मिळून काही तास उलटून गेले नाही तोच इस्त्राईलने गाझा पट्टीत हवाई हल्ला केला. यामध्ये एका आरोग्य केंद्राबाहेर मदतीसाठी उभे असलेले १५ जण मारले गेले. मृतांमध्ये १० बालकांचा समावेश आहे. या हल्ल्याबद्दल मानवाधिकार संघटनांनी इस्त्राईलवर टीका केली आहे.