इराणच्या इशाऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे सूचक विधान; अयातुल्ला खामेनींना दिले थेट आव्हान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला प्रादेशिक युद्धाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी (१ फेब्रुवारी) फ्लोरिडा येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले.

"आम्ही इराणसोबत लवकरच एखादा करार करू, अशी मला आशा आहे. मात्र, जर हा करार झाला नाही, तर खामेनी यांचे म्हणणे बरोबर होते की नाही, हे आपल्याला लवकरच कळेल," असे सूचक विधान ट्रम्प यांनी केले. इराणसोबतचा तणाव कमी करण्यासाठी राजनैतिक मार्गाचा अवलंब करण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, गरज पडल्यास अमेरिकेने या भागात तैनात केलेल्या लष्करी ताकदीचा वापर करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प पुढे म्हणाले, "आमच्याकडे जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली जहाजे तिथे (इराणच्या जवळ) तैनात आहेत. ही जहाजे त्यांच्या खूप जवळ पोहोचली आहेत. येत्या काही दिवसांत आपण नक्कीच एखादा करार करू."

तत्पूर्वी अयातुल्ला खामेनी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अमेरिकेला कडक शब्दात समज दिली होती. "जर अमेरिकेने युद्ध सुरू केले, तर यावेळी ते साधे युद्ध नसेल, तर ते एक 'प्रादेशिक युद्ध' असेल," असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकेने आपली युद्धनौका आणि विमाने पाठवून इराणला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले.

खामेनी यांनी इराणची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "इराणला कोणाशीही संघर्ष नको आहे. आम्ही कोणावरही अत्याचार करू इच्छित नाही किंवा कोणावर हल्ला करण्याची आमची इच्छा नाही. मात्र, जर कोणी आमच्यावर हल्ला करण्याचा किंवा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर इराणी जनता त्याला चोख आणि निर्णायक प्रत्युत्तर देईल."

अमेरिकेला इराणच्या सामरिक साधनसंपत्तीवर आणि भौगोलिक स्थानावर ताबा मिळवायचा आहे, असा आरोपही खामेनी यांनी केला. "अमेरिकेला इराण गिळंकृत करायचा आहे, पण इराणी जनता आणि इस्लामिक रिपब्लिक हे होऊ देणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

सध्या अमेरिकेची ' USS अब्राहम लिंकन' (USS Abraham Lincoln) ही युद्धनौका आणि इतर ताफा इराणच्या दिशेने रवाना झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकीमुळे मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे.