बांग्लादेशातील सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची कोलकात्यात हत्या

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 1 Months ago
अनवारुल अजीम अनवर
अनवारुल अजीम अनवर

 

नवी दिल्ली- बांग्लादेश सत्ताधारी पक्षाचे खासदार अनवारुल अजीम अनवर यांची भारतात हत्या झाली आहे. हे प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनवारुल यांची हत्या त्यांचाच मित्र आणि बिझनेस पार्टनरने पैशाच्या वादावरुन केली आहे. ढाका ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार, अकतारुज्जमान शाहीन याने कट रचून त्यांची हत्या केली आहे. यामध्ये त्याने काही मित्रांची देखील मदत घेतली आहे.

अनवारुल यांची हत्या करण्यासाठी शाहीन कोलकात्याला आला होता. हत्येचा कट रचून तो तो परत बांग्लादेशमध्ये गेला. सहा लोकांनी अनवारुल यांची उशीने तोंड दाबून हत्या केलीये. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करण्यात आले होते. मृतदेहाचे तुकडे एका बॅगमध्ये भरण्यात आले आणि ते अज्ञात ठिकाणी टाकण्यात आले.

कट कसा रचला?
रिपोर्टनुसार, बिझनेसमधील वादामुळे शाहीनने खासदाराच्या हत्येचा कट रचला. शाहीन याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व देखील आहे. त्यामुळेच तो हत्येचा कट रचून अमेरिकेला फरार झाला आहे. शाहीन ३० एप्रिलला अमान आणि एका महिलेसोबत कोलकातामध्ये आला. याठिकाणी त्याने एक रुम बुक केली. शाहीनने मित्र सियाम आणि जिहाद यांच्यासोबत मिळून अनवारुल यांना संपवलं.

१० मे रोजी शाहीन बांग्लादेशमध्ये परतला. त्याने हत्येची जबाबदारी अमानवर सोपवली होती. अमानने बांग्लादेशमधून दोन हिटमॅन कोलकातामध्ये बोलावले होते. १२ मे रोजी अनवारुल कोलकातामध्ये येणार असल्याचं त्यांना माहिती होतं. या दिवशी आरोपींनी त्यांना रुममध्ये बिझनेस मिटिंगसाठी बोलावलं. पण, घात करुन अनवारुल यांना पकडण्यात आलं अन् त्यांना संपवण्यात आलं.

बिल्डिंग जवळचे सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. यात अमान आणि काही मित्र एक ट्रॉली बॅग घेऊन जाताना दिसत आहे. मृतदेहाला अज्ञात स्थळी फेकल्यानंतर १७ मे रोजी अनवारुल यांचे दोन मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. जेणे करुन लोकेशनचा पत्ता लागू नये. त्यानंतर १७ मे रोजी हिट मॅन बांग्लादेशमध्ये परत गेले. पण, पोलिसांनी आपल्या बहिणीच्या घरी लपून बसलेल्या अमानला पकडलं. त्यानंतर त्याने हत्येची कबुली देत याच शाहीन मास्टरमाईंट असल्याचं सांगितलं.