पंतप्रधान मोदींना ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याकडून ग्रँड कॉलर ऑफ द सदर्न क्रॉस स्वीकारताना पंतप्रधान मोदी
राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याकडून ग्रँड कॉलर ऑफ द सदर्न क्रॉस स्वीकारताना पंतप्रधान मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवारी ब्राझीलचा सर्वोच्च नागरी सन्मान, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस, राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांनी प्रदान केला. 

“आज राष्ट्राध्यक्षांकडून ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळणे हा माझ्यासाठी आणि १४० कोटी भारतीयांसाठी अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे,” असे मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यासोबत प्रतिनिधी स्तरावरील चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.“मी त्यांचे (राष्ट्राध्यक्ष लुला), ब्राझील सरकार आणि ब्राझीलच्या जनतेचे मनापासून आभार मानतो,” असे त्यांनी पुढे सांगितले.

मोदी यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष लुला हे भारत-ब्राझील सामरिक भागीदारीचे शिल्पकार आहेत. हा सन्मान द्विपक्षीय संबंधांना उंचावण्याच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. “हा पुरस्कार त्यांच्या द्विपक्षीय संबंधांना अधिक उंचीवर नेण्याच्या अथक प्रयत्नांचा सन्मान आहे,” असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले. पंतप्रधानांनी सांगितले की हा सन्मान दोन्ही देशांच्या जनतेला त्यांचे सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळकट करण्यासाठी प्रेरणा देईल, असे निवेदनात नमूद आहे.

ब्राझीलचा सन्मान भारतीयांबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक
सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये मोदी यांनी सांगितले की हा पुरस्कार ब्राझीलच्या जनतेच्या भारतीयांबद्दलच्या खोल प्रेमाचे प्रतीक आहे. “आमची मैत्री येणाऱ्या काळात यशाची नवी उंची गाठो,” असे त्यांनी लिहिले.

मे २०१४ मध्ये सत्ता स्वीकारल्यापासून पंतप्रधान मोदी यांना परदेशी सरकारकडून मिळालेला हा २६ वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांना ‘द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. ते कॅरिबियन राष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पहिले परदेशी नेते ठरले.

राष्ट्राध्यक्ष भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्राध्यक्ष क्रिस्टीन कार्ला कांगालू यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मोदी यांच्या नेतृत्व, ग्लोबल साऊथच्या समर्थनासाठी आणि भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्या असाधारण प्रयत्नांचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला.मोदी दोन दिवसांच्या त्रिनिदाद आणि टोबॅगो दौऱ्यावर होते. त्यांनी या सन्मानासाठी सरकार आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या जनतेचे आभार मानले.