२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या साजिद मीरची हत्या करण्याचा प्रयत्न झालाय. साजिद मीर हा पाकिस्तानमधील डेरा गाझी खानच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. मीरला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. साजिद मीर हा लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी आहे.
साजिद मीर हा लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाईंड असणाऱ्यांपैकी एक होता. तो लाहोरच्या मध्यवर्थी कारागृहात असून त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मीरला पाकिस्तानी लष्कराने सीएमएच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बहावलपूर येथे विमानाने नेण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ऐकवला होता दहशतवाद्याचा ऑडिओ
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारताने केली होती. भारताच्या या मागणीला चीनने विरोध केला होता. दरम्यान भारतीय सुरक्षा एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड यादीत साजिद मीरच्या नावाचा समावेश आहे.
या दहशतवाद्याचा बचाव चीनकडून केला जात होता. चीनच्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने UN प्लॅटफॉर्मवर एक ऑडिओ देखील सर्व सभेला ऐकवला. यात मीर हा मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना सूचना देत असल्याचं स्पष्ट झालं होतं.
अमेरिका आणि भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत मीरला जागतिक दहशतवादी म्हणून काळ्या यादीत टाकले आहे. भारताने त्याची मालमत्ता जप्त करण्याची, हालचालींवर आणि शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली होती. २० जून रोजी चीनने या मुद्द्यावर व्हेटो पॉवर वापरून मीरला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता यांनी मीरचा दहशतवादी कटाचा ऑडिओ यूएनच्या सभेत ऐकवला.