अमेरिकन मुस्लिमांनी 'यामुळे' धुडकावले व्हाईट हाऊसच्या इफ्तार पार्टीचे निमंत्रण

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 25 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

अमेरिकेतील मुस्लिम समुदायाच्या काही लोकांनी व्हाईट हाऊसच्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.

गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात पॅलेस्टिनी नागरिकांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. आणि यामध्ये अमेरिकेचे प्रशासन सतत इस्त्रायलला पाठींबा देत असल्यामुळे अमेरिकेतील मुस्लिम बायडन यांच्यावर नाराज आहेत. हेच कारण पुढे करत ते व्हाईट हाऊसमधील इफ्तार पार्टीस जाण्यास तयार नाहीत.

अमेरिकेतील मुस्लिम समुदायाच्या सदस्यांनी या आठवड्यात व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या इफ्तार पार्टीचे आमंत्रण नाकारले आहे.

न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गाझामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक संघर्षामुळे व्यथित झालेल्या अनेक निमंत्रितांनी आणि इस्रायलकडून केल्या जात असलेल्या हल्ल्यांना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाठिंबा दिल्याने, इफ्तार पार्टीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकन मुस्लिम संघटनांनी व्हाईट हाऊसच्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकून व्हाईट हाऊसच्या बाहेर इफ्तार पार्टी आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

इस्लामिक सर्कल ऑफ नॉर्थ अमेरिका (IQNA) आणि अमेरिकन मुस्लिम फॉर पॅलेस्टाईन व्हाईट हाऊसच्या बाहेर होणाऱ्या इफ्तार पार्टीला उपस्थिती राहणार आहेत.

गाझामध्ये इस्रायलच्या सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊसच्या धोरणात बदल करण्याची मागणी करत अमेरिकाच्या मुस्लिम संघटनांनी युद्धबंदी व्हावी, असा आग्रह धरला आहे.

पुढील मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या या इफ्तार पार्टीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपराष्ट्रपती कमला हॅरीस, सरकारी मुस्लिम अधिकारी, राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी आणि अनेक मुस्लिम नेते उपस्थित राहू शकतात.

मात्र, व्हाईट हाऊसने उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. डिअरबॉर्न, मिशिगनचे महापौर अब्दुल्ला हम्मूद यांच्यासह मागील वर्षांतील कार्यक्रमांना आमंत्रित केलेल्या काहींना यावेळी आमंत्रित केले गेले नाही.