नेतन्याहूंकडून ट्रम्प यांचे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 23 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सोमवारी व्हाइट हाऊसमधील रात्रीच्या जेवणात सांगितले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. यापूर्वी दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने इराणच्या तीन अणु सुविधांवर बंकर बस्टर बॉम्बने हल्ला केला होता.

ट्रम्प आणि नेतन्याहू दोघांनीही व्हाइट हाऊसच्या या प्रसंगाला विजयोत्सव म्हटले आहे. ट्रम्प यांनी पुन्हा दावा केला की अमेरिकेने इराणच्या कारवायांचा पूर्ण नायनाट केला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले की त्यांच्या भागीदारीने अविश्वसनीय विजय मिळवला आहे.

गाझा युद्धाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले की हमासला इस्रायलशी युद्धविराम हवा आहे. नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॅलेस्टिनी लोकांना स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाचे कौतुक केले.

पॅलेस्टाईन आणि इस्रायलसाठी दोन-राष्ट्र उपाय
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षासाठी दोन-राष्ट्र उपायाच्या व्यवहार्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्याऐवजी त्यांनी हा प्रश्न इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडे सोपवला. “मला माहीत नाही,” असे ट्रम्प म्हणाले आणि प्रश्न नेतन्याहू यांना विचारला.

यावर उत्तर देताना नेतन्याहू म्हणाले, “आम्ही युनायटेड स्टेट्ससोबत पॅलेस्टिनी लोकांना चांगले भविष्य देणाऱ्या देशांचा शोध घेत आहोत. मला वाटते की पॅलेस्टिनी लोकांना स्वतःचे शासन करण्याचे सर्व अधिकार असावेत, पण आम्हाला धोका देण्याचा कोणताही अधिकार नसावा.”

इस्रायलचे पंतप्रधान यांनी जोर दिला की इस्रायल पॅलेस्टिनींशी शांतता करार करण्यास तयार आहे. पण ते म्हणाले, “सुरक्षेचे संपूर्ण सार्वभौमत्व नेहमी आमच्या हातात राहील.” पॅलेस्टिनी लोकांच्या स्थलांतर योजनेबाबत ट्रम्प म्हणाले की त्यांच्या प्रशासनाला इस्रायलच्या शेजारील देशांकडून उत्तम सहकार्य मिळाले आहे.

इराणवर ‘अविश्वसनीय विजय’- नेतन्याहू
नेतन्याहू यांनी व्हाइट हाऊसच्या रात्रीच्या जेवणात इराणच्या अणु सुविधांवरील अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचा विजयोत्सव साजरा केला. “मला वाटते की इस्रायल आणि युनायटेड स्टेट्समधील भागीदारी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि माझ्यातील भागीदारीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हा अविश्वसनीय विजय आहे,” असे ते म्हणाले.

इराणने अमेरिकेशी संपर्क साधला? ट्रम्प म्हणाले…
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की इराणच्या अणु सुविधांवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने व्हाइट हाऊसशी चर्चेसाठी संपर्क साधला आहे. त्यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांची तुलना दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणुबॉम्ब टाकण्याच्या निर्णयाशी केली.

“मला काय आठवले हे सांगू इच्छित नाही, पण खूप वर्षांपूर्वीच्या एका घटनेची आठवण झाली. हॅरी ट्रुमन यांचे चित्र आता लॉबीत आहे, जिथे असायला हवे तिथे नाही, पण त्याने खूप लढाई थांबवली आणि यानेही खूप लढाई थांबवली,” असे ते म्हणाले. “मला आशा आहे की आम्हाला पुन्हा इराणवर हल्ला करावा लागणार नाही,” असे त्यांनी पुढे सांगितले.

असदनंतर सिरिया
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी मध्य पूर्वेतील नेत्यांच्या, विशेषतः बेंजामिन नेतन्याहू यांच्या, विनंतीवरून सिरियावरील अमेरिकेचे निर्बंध हटवले. इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले की सिरियाच्या नव्या नेतृत्वामुळे इस्रायलला सिरियाशी नवे संबंध प्रस्थापित करण्याची संधी आहे.

नेतन्याहू म्हणाले की सिरियातील असद राजवटीचा पतन झाल्याने इस्रायल आणि सिरियामधील नव्या संबंधाची शक्यता निर्माण झाली आहे.“सर्वांना समजले आहे की परिस्थिती बदलली आहे,” असे ते म्हणाले. “यापूर्वी इराण सिरियावर हिजबुल्लाहद्वारे थेट नियंत्रण ठेवत होते. हिजबुल्लाहला नामोहरम केले आहे. इराण आता बाहेर आहे. यामुळे स्थिरता, सुरक्षा आणि शेवटी शांततेसाठी संधी आहे.”