नेपाळमधील आंदोलनावर भारताची नजर, पंतप्रधान मोदींनी साधला नव्या पंतप्रधानांशी संवाद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नेपाळच्या अंतरिम सरकारच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नेपाळमधील अलीकडच्या आंदोलनांमध्ये झालेल्या दुःखद जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान कार्की यांचे त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आणि भारत सरकारच्या वतीने आणि भारतीय जनतेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.

"नेपाळमध्ये शांतता आणि स्थिरता पुनर्स्थापित करण्यासाठी तसेच नेपाळी लोकांच्या प्रगतीसाठी भारत पूर्ण पाठिंबा देईल," असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले. दोन्ही देशांमधील विशेष संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत एकत्र काम करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधान कार्की यांनी भारताच्या या खंबीर पाठिंब्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्याच्या पंतप्रधानांच्या इच्छेला दुजोरा दिला.

 

या संवादादरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नेपाळच्या आगामी राष्ट्रीय दिनानिमित्तही शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेते संपर्कात राहण्यावर सहमत झाले.