सीरियामध्ये इराणी दूतावासावर इस्राईलच्या हल्ल्यात सात ठार

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 27 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सीरियामध्ये झालेल्या हल्ल्यात दमास्कस शहरातील इराणची वकिलात उद्ध्वस्त होऊन त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याबद्दल इराण सरकारने संताप व्यक्त केला आहे. हा हल्ला इस्राईलनेच केला असल्याचा संशय असून योग्यवेळी बदला घेतला जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.

गाझामधील युद्धात हमासला मदत करणाऱ्या इराणच्या सैनिकांना व अधिकाऱ्यांना इस्राईलने अनेकदा लक्ष्य केले आहे. यासाठी त्यांनी सीरिया आणि लेबनॉन या शेजारी देशांमध्येही लक्ष्यभेदी हल्ले केले आहेत. सोमवारी इस्राईलने दमास्कसमध्ये हल्ला करताना इराणच्या वकिलातीवरच क्षेपणास्त्रे टाकली. या हल्ल्यात इराणच्या सैन्यदलातील दोन अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला. इस्राईलने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरीही संशयाची सुई त्यांच्याच दिशेने आहे. मारले गेलेले अधिकारी सीरियामधील हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेला मदत करत असल्याचा इस्राईलचा आरोप होता. या हल्ल्याचा निश्‍चितपणे बदला घेतला जाईल, असा इशारा हिज्बुल्लानेही दिला आहे.

इराण सरकारनेही इस्राईलचा बदला घेण्याची भाषा केली आहे. त्यांनी सोमवारी रात्रीच अमेरिकेला एक महत्त्वाचा संदेश पाठविला असून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचीही तातडीची बैठक बोलाविण्याची मागणी केली आहे.