रशियाचे अध्यक्ष व्हादिमीर पुतिन सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे सध्या इस्राइल आणि हमासमध्ये भीषण संघर्ष सुरु आहे. यात अमेरिकेने इस्राइलला पूर्ण पाठिंबा दिला असल्याने अरब देश नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर पुतिन यांचा अरब देशांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
पुतिन या आठवड्यात युएई आणि सौदी अरेबियाचा एक दिवसीय दौरा करतील अशी माहिती रशियाच्या माध्यमांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी ओपेक+ समूह देशांची बैठक झाली होती. यावेळी सदस्य देशांनी दरदिवशी २.२ मिलियन बॅरलचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगानेही या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे.
पुतिन यांनी युक्रेनसोबत युद्ध छेडल्यापासून क्वचितच विदेश दौरा केला आहे. त्यामुळे त्यांच्या अरब दौऱ्याकडे विशेष लक्ष असेल. ते आधी युएई आणि त्यानंतर सौदी अरेबियाला भेट देतील. सौदीमध्ये ते क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा करतील. त्यांनी शेवटचा दौरा चीनचा केला होता.
पश्चिम देशांना इशारा
ओपेक+ मध्ये सहयोग मिळावा, तसेच बिगर-पश्चिमी देशांसोबत आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यास पुतिन इच्छूक आहेत. सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. अशात काही देशांना आपल्याकडे वळवणे, तसेच अरब देशांचा आपल्याला पाठिंबा असल्याचं दाखवणे असा पुतिन यांचा उद्देश आहे.
अमेरिकेने इस्राइलला पाठिंबा दिला असल्याने अरब देश रशियाच्या युद्धाबाबत अनुकूल दृष्टीकोण ठेवतील अशी पुतिन यांना अपेक्षा आहे. यामाध्यमातून त्यांना अमेरिकेवर दबाव वाढवता येईल. जेणेकरुन अमेरिकेचा युक्रेनला असलेला पाठिंबा कमी होईल.
अटकेची भीती
आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) पुतिन यांच्याविरोधात युद्ध गुन्ह्यासाठी अटक वॉरंट जारी केलाय. रशियाने याचा विरोध केला असून हा प्रकार अपमानजनक असल्याचं म्हटलं आहे. रशिया आयसीसीचा सदस्य नाही. त्यामुळे त्यांनी लावलेले आरोप आपल्याला लागू होत नाहीत अशी रशियाची भूमिका आहे. शिवाय युएई आणि सौदी अरेबिया हे देश देखील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचे सदस्य नाहीत. त्यामुळे अटकेच्या भीतीशिवाय ते दौरा करु शकतात.