पाकिस्तान, अफगाणिस्तानात तीव्र भूकंपाचे धक्के

Story by  Awaz Marathi | Published by  vivek panmand • 1 Years ago
दिल्ली आणि उत्तर भारतातही जाणवला भूकंपाचा परिणाम
दिल्ली आणि उत्तर भारतातही जाणवला भूकंपाचा परिणाम

 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मंगळवारी ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले, या दोन्ही देशांच्या अनेक भागात झालेल्या भूकंपामुळे किमान नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले, एपीच्या अहवालानुसार काल रात्री दिल्ली-एनसीआर भागात आणि संपूर्ण उत्तर भारताचा बराचसा भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.


लष्कराच्या आणि इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, वायव्य पाकिस्तानच्या विविध भागांमध्ये छत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानच्या केंद्रस्थानी असलेल्या या भूकंपात डझनभर लोक जखमी झाले आहेत.


भूकंपामुळे काही डोंगराळ भागात भूस्खलन झाल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, झेलम, शेखूपुरा, स्वात, नौशेरा, मुलतान, स्वात, शांगला यासह पाकिस्तानातील विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. भारत, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि चीनसह अनेक देशांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले.


इस्लामाबादमधील इमारतींना भेगा

दुर्गम भागात किमान 19 मातीची घरे कोसळली, असे वायव्येकडील प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते तैमूर खान यांनी सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही अजूनही नुकसानीची आकडेवारी गोळा करत आहोत.' पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील या शक्तिशाली भूकंपामुळे अनेकांना घरे आणि कार्यालये सोडून पलायन करावे लागले. यावेळी इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणमधील काही श्लोकांचे पठण करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार शहरातील काही अपार्टमेंट इमारतींमध्ये भेगा पडल्या आहेत.


अफगाणिस्तानात होता भूकंपाचा केंद्रबिंदू

यूएस जिओलॉजिकल सर्व्हिसेसच्या मते, ६.५ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या जुर्मपासून ४० किमी आग्नेयेला होता. भूकंप सुमारे १९० किमी खोलीवर झाला. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने 10.17.27 वाजता (IST) भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी मोजली. त्याचे केंद्र उत्तर अफगाणिस्तानमधील फैजाबादच्या दक्षिण-पूर्वेस १३३ किमी अंतरावर १५६ किमी खोलीवर होते.


दिल्लीही हादरलं!

मंगळवारी संध्याकाळी दिल्ली-नॅशनल कॅपिटल रीजन (NCR) सह उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे धक्के काही सेकंद जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली. रात्री १०.१७ वाजता शक्तिशाली भूकंप झाला. सध्या तरी जीवित व वित्तहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.


भूकंपाच्या धक्क्यांनंतर लोक घाबरून घराबाहेर पडले. हरियाणा, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपानंतर लगेचच जम्मू प्रदेशातील काही भागात मोबाईल सेवा विस्कळीत झाली. उत्तरकाशी आणि चमोलीसह उत्तराखंडमध्येही अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले.