सिडनी हादरले! बाप-लेकाने केला १५ जणांचा खात्मा; बॉन्डी बीचवर रक्ताचा सडा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सिडनीच्या बॉन्डी बीचवर ज्यू समुदायाच्या कार्यक्रमात १५ जणांची निर्घृण हत्या करणारे दोघे संशयित हल्लेखोर हे बाप आणि लेक होते. पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या घटनेमुळे ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली असून लोकांनी मृतांना श्रद्धांजली वाहायला सुरुवात केली आहे. गेल्या ३० वर्षांतील हा ऑस्ट्रेलियातील सर्वात भीषण बंदूक हिंसाचार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षांचा वडील घटनास्थळीच मारला गेला. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा १६ झाला आहे. तर त्याचा २४ वर्षांचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. एबीसी आणि इतर स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वडिलांचे नाव साजिद अक्रम आणि मुलाचे नाव नवीद अक्रम असे आहे.

जाणीवपूर्वक केलेला हल्ला

अधिकाऱ्यांनी रविवारी घडलेल्या या गोळीबाराचे वर्णन 'ज्यू विरोधी' (अँटी-सेमिटिक) हल्ला असे केले आहे. हल्ल्यानंतर ४० लोक अजूनही रुग्णालयात आहेत. यात दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे. १० वर्षांच्या चिमुरडीपासून ते ८७ वर्षांच्या वृद्धापर्यंतचे लोक या हल्ल्याला बळी पडले आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, प्रसिद्ध बॉन्डी बीचवर ही घटना घडली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने संध्याकाळी तिथे प्रचंड गर्दी होती. सुमारे १० मिनिटे हा थरार सुरू होता. गोळीबार सुरू होताच शेकडो लोकांनी जीव वाचवण्यासाठी वाळूतून आणि जवळच्या रस्त्यांवर धाव घेतली.

बीचला लागून असलेल्या एका छोट्या पार्कमध्ये 'हनुक्का' या ज्यू सणाच्या कार्यक्रमासाठी सुमारे १००० लोक जमले होते. पोलिसांच्या मते, हा हल्ला याच कार्यक्रमाला लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला होता.

फळवाला ठरला 'हिरो'

या हल्ल्यादरम्यान एका व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने एका सशस्त्र हल्लेखोराला पकडून त्याचे शस्त्र खाली पाडले. ४३ वर्षांच्या या व्यक्तीचे नाव अहमद अल अहमद आहे. ते फळांचे दुकान चालवतात. त्यांच्या एका नातेवाईकाने '७ न्यूज ऑस्ट्रेलिया'ला सांगितले की अहमद यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. लोकांनी त्यांना 'हिरो' मानले असून त्यांच्या उपचारासाठी सोमवारी दुपारपर्यंत साडेतीन लाख डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.

हल्लेखोरांची पार्श्वभूमी

पोलिसांनी अद्याप हल्लेखोरांची नावे अधिकृतपणे जाहीर केली नाहीत. पण त्यांनी सांगितले की वडिलांकडे २०१५ पासून बंदुकीचा परवाना होता आणि त्यांच्याकडे सहा नोंदणीकृत शस्त्रे होती. गृहमंत्री टोनी बर्क यांनी माहिती दिली की, वडील १९९८ मध्ये विद्यार्थी व्हिसावर ऑस्ट्रेलियात आले होते, तर मुलगा हा ऑस्ट्रेलियातच जन्मलेला नागरिक आहे.

घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये हे हल्लेखोर 'बोल्ट-ॲक्शन रायफल' आणि 'शॉटगन' मधून गोळ्या झाडताना दिसत आहेत. न्यू साऊथ वेल्सचे पोलीस आयुक्त माल लॅनियन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आम्ही दोन्ही व्यक्तींची पार्श्वभूमी तपासत आहोत. सध्या आम्हाला त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आहे."

प्रत्यक्षदर्शींचा थरार

स्थानिक नागरिक मॉर्गन गॅब्रिएल (२७) यांनी सांगितले की, त्या जवळच सिनेमाला निघाल्या होत्या. त्यांना सुरुवातीला वाटले की फटाके फुटतायत. पण लोक रस्त्यावर धावू लागल्याचे पाहून त्या सावध झाल्या. त्या म्हणाल्या, "मी सहा-सात जणांना आश्रय दिला. त्यातील दोघे माझे मित्रच होते. लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते, त्यांचे फोन बीचवरच राहिले होते."

त्या पुढे म्हणाल्या, "आजची सकाळ खूप दु:खद आहे. एरवी सोमवारी सकाळी इथे पोहणाऱ्यांची आणि सर्फिंग करणाऱ्यांची गर्दी असते. पण आज इथे स्मशानशांतता आहे." बॉन्डी पॅव्हेलियनमध्ये एक तात्पुरते स्मारक उभारण्यात आले असून तिथे लोकांनी फुले आणि इस्रायल व ऑस्ट्रेलियाचे झेंडे लावले आहेत.

जागतिक नेत्यांकडून निषेध

या हल्ल्यात केवळ दोनच हल्लेखोर होते, तिसरा कोणीही नव्हता, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. सिडनीच्या पश्चिमेला ३६ किमी अंतरावर असलेल्या बॉनीरिग येथील संशयितांच्या घराला पोलिसांनी वेढा घातला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन फुले वाहिली. ते म्हणाले, "काल जे घडले ते शुद्ध सैतानी कृत्य आहे. ऑस्ट्रेलियाच्या एका प्रसिद्ध ठिकाणी घडलेला हा दहशतवादी हल्ला आहे. आज ज्यू समुदाय दुखावला आहे. आम्ही सर्व ऑस्ट्रेलियन नागरिक त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ज्यू द्वेष संपवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू."

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही अल्बानीज यांच्याशी संपर्क साधून शोक व्यक्त केला आहे.

इस्रायलची टीका

ऑक्टोबर २०२३ मध्ये इस्रायल-गाझा युद्ध सुरू झाल्यापासून ऑस्ट्रेलियात ज्यू विरोधी हल्ले वाढले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले की, त्यांनी अल्बानीज यांना इशारा दिला होता. पॅलेस्टाईनला देशाचा दर्जा देण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेमुळे ज्यू द्वेष वाढेल, असे त्यांनी सांगितले होते. गेल्या ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने इराणवर ज्यू विरोधी हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता.

३० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला

ऑस्ट्रेलिया हा जगातील सुरक्षित देशांपैकी एक मानला जातो. तिथे अशा घटना दुर्मिळ आहेत. १९९६ मध्ये पोर्ट आर्थर येथे एका माथेफिरूने ३५ जणांना मारले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

रब्बी मेंडेल कस्टेल यांचे मेहुणे एली श्लॅन्जर या हल्ल्यात मारले गेले. कस्टेल म्हणाले, "रागावून किंवा एकमेकांवर आरोप करून काहीही होणार नाही. आपण एक समाज म्हणून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ऑस्ट्रेलियन समाज आम्हाला यातून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करेल."

घटनास्थळी असलेल्या डॅनियल नावाच्या महिलेने सांगितले की, "गोळीबाराचा आवाज ऐकताच मी माझ्या मुलीला आणण्यासाठी धावत सुटले. ती जवळच एका कार्यक्रमात होती. मी जमिनीवर मृतदेह पडलेले पाहिले. ७ ऑक्टोबरपासून आम्ही भीतीच्या छायेतच जगत आहोत."

ऑस्ट्रेलियात सुमारे २ कोटी ७० लाख लोकसंख्या असून त्यात दीड लाख ज्यू नागरिक आहेत. सिडनीच्या बॉन्डी परिसरात त्यांची संख्या मोठी आहे. या घटनेनंतर लंडन, बर्लिन आणि न्यूयॉर्कमध्ये ज्यू कार्यक्रमांच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.