तुर्की आणि सीरिया मधील भूकंपबळींची संख्या २८ हजारांवर

Story by  vivek panmand | Published by  vivek panmand • 1 Years ago
टर्की भूकंप
टर्की भूकंप

 

 तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपातील मृतांची संख्या २८ हजारांवर गेली असून ही संख्या दुप्पट किंवा त्याहून अधिक होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या मदतकार्य विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ यांनी आज व्यक्त केला. ग्रिफिथ यांनी तुर्कीमधील भूकंपग्रस्त कारामनमरास या भागाला भेट दिली आहे.

 
भूकंपाचा केंद्रबिंदू कारामनमरास याच गावाजवळ होता. सोमवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटेच्या वेळी बसलेल्या या भूकंपाने हजारो जणांचा ते झोपेत असतानाच बळी घेतला. मार्टिन ग्रिफिथ यांनी भूकंपामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत संयुक्त राष्ट्रांतर्फे केल्या जाणाऱ्या मदत आणि बचावकार्याचाही आढावा घेतला आहे. त्यानंतर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी ग्रिफिथ म्हणाले,‘‘भूकंपामुळे झालेली हानी प्रचंड असून जीवितहानीचा निश्‍चित अंदाज व्यक्त करणे अवघड आहे. मात्र, ढिगारे बाजूला करण्याचे बरेच काम बाकी असून मृतांची संख्या सध्यापेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिकपर्यंत जाण्याची शक्यता आहे. सध्या फक्त जितके मृतदेह सापडत आहेत, त्यांचीच नोंद केली जात आहे. आणखी अनेक जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.’’
 
तुर्की आणि सीरियामध्ये सध्या प्रचंड थंडीचे वातावरण असूनही हजारो कर्मचारी आणि स्वयंसेवक ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत. भूकंपामुळे लाखो लोक बेघर झाले आहेत. तुर्कीच्या तुलनेत कमी नुकसान झालेल्या सीरियात ५३ लाख लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

भूकंपाचा परिणाम
२.६० कोटी : लोकांना भूकंपाचा फटका
८.७० लाख : लोकांना तातडीने अन्न पुरविणे आवश्‍यक
४.२८ कोटी डॉलर : तातडीची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी निधी आवश्‍यक