POJK UNREST: लंडनमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाविरोधात काश्मिरी नागरिकांचे आंदोलन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
लंडनमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाविरोधात काश्मिरी नागरिकांचे आंदोलन
लंडनमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाविरोधात काश्मिरी नागरिकांचे आंदोलन

 

लंडन 

पाकव्याप्त काश्मीरमधील (PoJK) पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाहीविरुद्ध लंडनमध्ये हजारो काश्मिरी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. पार्लमेंट स्क्वेअर ते ट्रॅफालगर स्क्वेअरपर्यंत काढण्यात आलेल्या या भव्य मोर्चात आंदोलकांनी पाकिस्तान सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.

'पाकिस्तान फोर्सेस आऊट'च्या घोषणा

लंडनमध्ये जमा झालेल्या हजारो आंदोलकांनी 'पाकिस्तान फोर्सेस आऊट' (पाकिस्तानी सैन्याने बाहेर पडावे) अशा घोषणा देत पाकव्याप्त काश्मीरमध्ये शांतता आणि मानवाधिकारांची मागणी केली. 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'च्या (JAAC) समर्थनार्थ ही निदर्शने करण्यात आली असून, आंदोलकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणाऱ्या नागरिक हत्या, महिलांचा छळ आणि शांततामय आंदोलकांवर बळाचा वापर केला जात असल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. रावळकोटमध्ये पोलीस आणि जेएएसी (JAAC) कार्यकर्त्यांमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसक संघर्षानंतर, आंदोलकांचा संताप अधिक तीव्र झाला आहे.

मानवाधिकार संघटनांची चिंता

पाकिस्तान सरकारने जेएएसीवर (JAAC) दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत बंदी घालण्याच्या घेतलेल्या निर्णयावर 'ह्युमन राइट्स कमिशन ऑफ पाकिस्तान'नेही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधी ब्रॅडफोर्ड येथील पाकिस्तानी दूतावासाबाहेरही अशाच प्रकारची निदर्शने करण्यात आली होती. लंडनमध्ये झालेल्या या मोठ्या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, भारत सरकारची भूमिका स्पष्ट आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश हे भारताचे अविभाज्य भाग आहेत. १९४७ मध्ये जम्मू-काश्मीरच्या कायदेशीर आणि अपरिवर्तनीय विलीनीकरणामुळे हा भाग भारताचा भाग राहिला असून, पाकिस्तानचा या प्रदेशावरील ताबा हा बेकायदेशीर असल्याचे भारताने वारंवार स्पष्ट केले आहे.