डोनाल्ड ट्रम्प यांचा 'ब्रिक्स'ला इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

 

'ब्रिक्स' गटाच्या अमेरिकाविरोधी धोरणांचे अनुसरण करणाऱ्या देशांवर दहा टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागू करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिला. यातून कोणालाही सूट दिली जाणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. यामुळे मागील काही दिवसांपासून भात्यात ठेवलेले 'आयात शुल्का'चे अस्त्र ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बाहेर काढल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत, रशिया, ब्राझील, चीन आणि दक्षिण आफ्रिकेसह नव्याने सहभागी झालेल्या सदस्य देशांची ब्राझीलमध्ये परिषद सुरू आहे. या परिषदेमध्ये ट्रम्प यांचे नाव न घेता आयातशुल्क वाढीचा निषेध करण्यात आला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या टूथ' या सोशल मीडिया कंपनीच्या खात्यावरून पोस्ट करत अमेरिकाविरोधी धोरण राबविणाऱ्या देशांवर १० टक्के अतिरिक्त शुल्क लागू करणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, याबाबतचे पत्रही संबंधित देशांना पाठविण्यास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या या घोषणेवा भारताला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर लागू केलेल्या आयातशुल्कातून चर्चेनंतर सवलत देण्यात आली होती. आता मात्र कोणालाही सवलत अथवा सूट मिळणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

'ब्रिक्स'च्या ठरावात इस्त्राईलवर टीका
'ब्रिक्स' गटातील देशांनी आपल्या परिषदेत रविवारी रात्री ठराव मंजूर करताना त्यात इराणवरील हल्ल्याचा निषेध केला, तसेच, आखाती देशात इस्राईलकडून होत असलेल्या हल्ल्याचाही निषेध केला. या ठरावाच अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणाचाही निषेध करण्यात आला. मात्र, या ठरावात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे थेट नाव घेणे टाळले गेले. तसेच, युक्रेनवरील हल्ल्याबाबत सदस्य देश असलेल्या रशियाचाही निषेध करण्याचे या गटाने टाळले. या परिषदेला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे अनुपस्थित आहेत. या परिषदेचे यजमान असलेल्या ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनाशिओ सुला दा सिल्वा यांनी शांततेपेक्षा युद्धात गुंतवणूक केली जात असल्याचद्दल नाराजी व्यक्त केली.

चीनकडून निषेध
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यावर 'ब्रिक्स'चा सदस्य असलेल्या चीनने नाराजी व्यक्त केली आहे. 'ब्रिक्स' समूह ही वाद घालण्याची जागा नसून आम्ही कोणत्याही देशाला लक्ष्य करत नाहीत, असे चीनने स्पष्ट केले. "ब्रिक्स हे विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या देशांसाठी एकमेकांना सहकार्य करण्यासाठीचे व्यासपीठ आहे. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणाबाबत आमची भूमिका स्पष्ट असून व्यापारयुद्धातून कोणीही विजयी होणार नाही," असे चीनचे परराष्ट्र मंत्री बंग यी यांनी सांगितले.