US IRAN PEACE DEAL: जागतिक युद्धाचा धोका टळला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे संयुक्त राष्ट्रप्रमुख अँटोनियो गुटेरेस
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचे संयुक्त राष्ट्रप्रमुख अँटोनियो गुटेरेस

 

संयुक्त राष्ट्र 

अमेरिका आणि इराण यांच्यातील १०७ दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाचा अंत झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही देशांनी एका ऐतिहासिक शांतता करारावर स्वाक्षरी केली असून, यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) पुन्हा खुली होणार आहे. या कराराचे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी स्वागत केले आहे.

शांततेसाठी महत्त्वाचे पाऊल

रविवारी या कराराबाबत अधिकृत निवेदन जारी करताना गुटेरेस यांनी याला संघर्षाच्या शांततामय तोडग्यासाठीचे एक निर्णायक पाऊल असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सायंकाळी 'ट्रुथ सोशल'वर या कराराची घोषणा केली. या करारानुसार, दोन्ही देशांमध्ये तत्काळ आणि कायमस्वरूपी युद्धविराम लागू करण्यात आला आहे. तसेच, पुढील वाटाघाटींसाठी एक फ्रेमवर्क देखील तयार करण्यात आले आहे. आगामी १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये या करारावर औपचारिक स्वाक्षरी होणार आहे.

प्रादेशिक देशांच्या भूमिकेचे कौतुक

या वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी पाकिस्तान, कतार, इजिप्त, सौदी अरेबिया आणि तुर्की यांसारख्या प्रादेशिक देशांनी बजावलेल्या विधायक भूमिकेचे गुटेरेस यांनी विशेष कौतुक केले आहे. या देशांच्या सहकार्यामुळेच हा करार शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या कराराला दुजोरा दिला आहे, मात्र १९ जून रोजी अधिकृत स्वाक्षरी होईपर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जागतिक इंधन पुरवठ्यापैकी एक-पंचमांश हिस्सा ज्या सामुद्रधुनीतून प्रवास करतो, ती 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' या संघर्षामुळे बंद होती. यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. या कराराने जागतिक इंधन बाजारावरील दबाव कमी करण्यास मदत होणार असून, संयुक्त राष्ट्र या शांतता प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे गुटेरेस यांनी स्पष्ट केले.